एका शास्त्रज्ञाने महिलेच्या मुलास मारहाण करून तिचा विनयभंग केला.. त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली खरी, पण त्यानंतर तिच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. न्यायालयात खटला उभा राहिल्यावरही प्रत्येक तारखेला ही महिला हजर राहत होती. या शास्त्रज्ञाकडून महिलेचा व तिच्या नातेवाईकांवर दबाब आणण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र, या महिलेने कोणत्याही दबाबाला बळी न पडता न्यायालयीन लढा सुरूच ठेवला.. तिच्या लढय़ाला यश आल ते तब्बल दहा वर्षांनंतर! तिचा विनयभंग केल्याबद्दल त्या शास्त्रज्ञाला न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नरेंद्र मधुकर हिरवे (रा. महात्मा गांधी मार्ग, लष्कर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शास्त्रानाचे नाव आहे. तो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या ठिकाणी कनिष्ठ स्तर शास्त्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. या गुन्ह्य़ातील पीडत महिला एका रुग्णालयात नोकरीस आहेत. हिरवे याने त्या महिलेच्या मुलास किरकोळ कारणावरून मारहाण केली. तो मुलगा घरी रडत आल्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी या महिला केल्या. त्या वेळी हिरवे याने संबंधीत महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार केली. २५ मे २००४ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपींने महिलेला व तिच्या नातेवाईकांवर दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु केला. संबंधीत महिला प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहत होती. त्या वेळी हिरवे दहा ते पंधरा व्यक्ती घेऊन हजर राहत असे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन विनाकारण थांबत होता. या मानसिक त्रासाला न घाबरता आणि तारखांवर तारखा पडत असताना देखील महिलेने न डगमगता आपला न्यायालयीन लढा सुरू ठेवला. सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी यांनी काम पाहिले. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकून सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची सुनावली. या गुन्ह्य़ाचा तपास सहायक पोलीस फौजदार दशरथ जाधव यांनी केला. दहा वर्षांनंतर आरोपीला शिक्षा झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळाल्याची भावना महिलेच्या पतीने व्यक्त केली.