जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करण्याची घटना कोंढवा परिसरात घडली. पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले.
अमित अशोक मुखेडकर (वय ३५), शुभम शशी गुप्ता (वय १९), योगेश राजकृष्ण चौगुले (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बावीस वर्षीय तरुणीने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या रविवारी (एक मे) बावीस वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत एका कार्यक्रमावरून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोटारीतून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी मुखेडकर, गुप्ता आणि चौगुले यांनी मोटारीतून त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी त्यांची मोटार अडविली आणि तरुणीच्या वेशभूषेवरून अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर पीडित तरुणीला मोटारीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तिघांना प्रतिकार केला. झटापटीत तिचे कपडे फाटले. आरोपी तेथून पसार झाले.
ही घटना घडल्यानंतर तरुणीला मानसिक धक्का बसला. तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींचे वर्णन आणि मोटारीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपी चौगुले, मुखेडकर आणि गुप्ता यांना अटक केली.
तिघा आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षक वर्षांराणी पाटील यांनी दिली.