X

अभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ

संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय संगणक अभियंता तरूणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने तरुणीला चार तास बसवून घेतल्याचंही सांगण्यात येते आहे. त्यानंतर तरुणी तक्रार न देताच निघून गेली. याप्रकरणी तरूणीने तिच्या वकिलामार्फत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना नोटीस पाठवली ज्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.अद्याप या पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले नाही.

सविस्तर माहिती अशी की,संबंधित संगणक अभियंता तरुणी ही गेल्या तीन वर्षांपासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेल मध्ये राहते.दिनांक ९ सप्टेंबर रोजी तरुणी पहाटे पाऊनेचार च्या सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावर गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तरुणीचा विनयभंग केला.तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण हा पळून गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात अज्ञात तरुण हा या अगोदर देखील हॉस्टेलच्या बाहेर टेहळणी करत असल्याच तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे.

तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने चार तास बसवून ठेवले.तरुणी कंटाळून तक्रार न देताच निघून गेली.त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्त यांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचे सांगितले.त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसार तक्रार दाखल करून घेतली आहे.