एसटीतून प्रवास करीत असताना तळेगावच्या हद्दीत २८ वर्षीय विवाहित महिलेचा सहप्रवाशाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली असून किरण नामदेव थोरात या आरोपीला अटक करण्यात आहे. दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला खेड ते तळेगाव या मार्गावर एकटीच एसटीने प्रवास करीत होती. या महिलेच्या मागील सीटवर आरोपी किरण थोरात बसला होता. आरोपीने सीटच्या आणि खिडकीच्या सांधीमधून महिलेच्या कंबरेला पकडले. यामुळे घाबरलेल्या महिलेने तात्काळ फोनवरून आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईक तळेगाव बस स्थानकात आले आणि एसटीत घुसून किरण थोरातला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांनी चालकाला एसटी थेट तळेगाव पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. या ठिकाणी पीडित महिलेने आरोपी किरण थोरात विरोधात तक्रार नोंदवली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुट पाटील करीत आहेत.