शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनमानी सुरू असून राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची फरपट होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. आराखडय़ासंबंधी नुकतेच जे निर्णय झाले ते रहित करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला आराखडा आणि त्याला देण्यात आलेल्या शेकडो उपसूचना वादग्रस्त ठरल्या असून त्याबाबत आता नगरविकास खात्याचा कारभार असलेल्या मुख्यमंत्र्यांकडेच तक्रारी केल्या जात आहेत. मुख्य सभेत आराखडय़ाला ज्या उपसूचना देण्यात आल्या, त्यांचा विचार करता त्या अमलात आणणे नगरनियोजन अधिकाऱ्यांना अवघड होणार आहे. त्यामुळे धोरण व कार्यपद्धतीच्या विरोधात जो ठराव झाला आहे तो भाग विखंडित होणे आवश्यक आहे, असे पत्र काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीकडून आराखडा मार्गी लागण्यासाठी मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होणार आहे. राष्ट्रवादीला साथ देऊन काँग्रेसने हा आराखडा मंजूर करून घेतला असून आता या आराखडय़ाला अनेक प्रकारच्या विसंगत उपसूचना दिल्या जात आहेत. त्याबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे, हेही स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची फरपट होईल. इतकेच नव्हे, तर शहराच्या विकासावर जे दूरगामी व चुकीचे परिणाम होतील त्यालाही काँग्रेसला जबाबदार धरले जाईल, असेही बागूल यांनी या पत्रात म्हटले आहे.
आराखडा मंजूर करताना कायद्यात बसू न शकणाऱ्या अनेक उपसूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकास आराखडय़ाच्या या विषयात आपण स्वत: लक्ष घालून त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशीही विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.