पुणे शहराच्या सर्वच भागात मंगळवारी दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सुमारे तास-दीड तास पडलेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत २१.५ मिलिमीटर इतकी नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात अशाच वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र, धरणांच्या क्षेत्रात पाऊस न पडल्याने त्यांच्या साठय़ात वाढ पाहायला मिळाली नाही. सध्या पुण्याच्या धरणांमध्ये १४.७२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ५०.५० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुण्याच्या परिसरात गेले आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण आहे. सकाळपासूनचा उकाडा आणि दुपारनंतर जोरदार सरी अनुभवायला मिळत आहेत. मंगळवारीसुद्धा दुपारी सव्वाचार-साडेचारच्या सुमारास अशाच प्रकारे पावसाला सुरुवात झाली. त्याने सुमारे तास-दीड तास शहराला झोडपून काढले. कमी वेळात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. सायंकाळची वेळ असल्याने अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. पुणे वेधशाळेत २१.५ मिलिमीटर, तर लोहगाव विमानतळ येथे २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धरणांमध्ये ५०.५० टक्के साठा
पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांच्या क्षेत्रात मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नाही. सोमवारीसुद्धा तेथे पाऊस पडला नाही. चारही धरणांमध्ये मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा सध्या १४.७२ टीएमसी इतका आहे. पुढच्या काळात संततधार पाऊस पडला तर त्यात वाढ होऊ शकेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. या धरणांमधील साठय़ाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- खडकवासला (१९.७८), पानशेत (६१.८७), वरसगाव (४७.८१), टेमघर (४३.५९).