मोसमी पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागाला पुन्हा हूल दिली असून, आता ६ जुलैऐवजी ११ जुलैच्या सुमारास त्याचे पुनरागमन होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्याला निमित्त झाले आहे, प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या तीव्र चक्रीवादळाचे. त्या वादळाचा जोर ओसरल्यानंतरच म्हणजे पुढील आठवडय़ाच्या उत्तरार्धात आपल्याकडे पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह देशाच्या ९१ टक्के क्षेत्रावर पावसाची अवकृपा झाली असून, या सर्व क्षेत्रावर अपुरा पाऊस पडला आहे.
या वेळच्या पावसाने हवामान विभागाचे अंदाज वेळोवेळी धुडकावून लागले. देशात ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज पहिल्या टप्प्यात वर्तविण्यात आला होता. तो बदलून दुसऱ्या टप्प्यात ९३ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला. त्यानंतर आता पाऊस कधी सक्रिय होणार, याबाबतही हवामान विभागाचे अंदाज फसले आहेत. संपूर्ण जून महिन्यातील असमाधानकारक पावसानंतर ५/६ जुलैच्या आसपास पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आतासुद्धा हा अंदाज खोटा ठरवत पावसाने हूल दिली आहे. हवामान विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ११ जुलैच्या आसपास पाऊस सक्रिय होण्याच्या आशा आहेत. तोवर किनारपट्टीवर काही प्रमाणात पाऊस पडेल. मात्र, अंतर्गत भागात मोठय़ा प्रमाणात पावसाची शक्यता नाही.

मुंबईत दोन दिवसानंतर पाऊस
तीन दिवसांपूर्वी मुसळधार पडलेल्या पावसाने विश्रांती घेतली असून, दोन दिवसांनी मुंबईत पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.दोन दिवसांनी पावसाचा प्रभाव वाढू शकेल. सोमवारपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. पावसाचा जोर ओसरल्याने तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी कोकण किनारपट्टीवर हर्णे, देवगड, महाड, श्रीवर्धन आणि अलिबाग येथे ३० ते ५० मिमी पाऊस पडला.