कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. आगामी ४८ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडय़ामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथून रविवारी मोसमी पाऊस परतला.

गेल्या २४ तासांमध्ये पेण, मुंबई, दोडामार्ग, मालवण, ठाणे, देवगड, कुडाळ, कानकोन, कल्याण, रोहा, सुधागड, पाली, उल्हासनगर,  बेलापूर, माथेरान, पनवेल, पोलादपूर, खालापूर, उरण, वैभववाडी येथे पावसाने हजेरी लावली.   ऑक्टोबरमध्ये परतीचा मोसमी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार शुक्रवार (२ ऑक्टोबर) आणि शनिवारी (३ ऑक्टोबर) पुणे शहरात हलक्या स्वरूपात पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर काही काळ हवामान ढगाळ असताना पाऊस हजेरी लावेल, अशी शक्यता असताना पावसाने हुलकावणी दिली. सोमवारी (५ ऑक्टोबर) कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाडय़ात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

परतीचा प्रवास..

गेल्या सहा दिवसांपासून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांतून मोसमी पाऊस परतला असल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. सोमवारपासून पश्चिम राजस्थानातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. पावसाने दिलेली उघडीप, वाऱ्यांची बदललेली दिशा, हवेतील ओलावा (आद्र्रता) कमी झाल्याने मोसमी पाऊस वायव्य भारतातून परतला आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास वेगाने होत आहे.