News Flash

‘तो’ शहरात आलाय पण, बरसलाच नाही..!

मोसमी पावसाचा जोर वाढण्यास काही कालावधी लागणार

मोसमी पावसाचा जोर वाढण्यास काही कालावधी लागणार

धरणे तुडुंब होऊन पाण्याची वर्षभराची गरज भागविण्यासाठी त्याची नितांत गरज असल्याने तो शहरात तीन दिवसांपूर्वीच पोहोचला आहे. त्यामुळे सर्वच सुखावले असले, तरी तो अद्यापही हवा तसा बरसलाच नाही. त्यामुळे आता त्याची चर्चा होऊ लागली आहे.. हो ही नैर्ऋत्य मोसमी पावसाचीच चर्चा आहे. तीन दिवसांपासून शहरात ढग येतात आणि काही वेळात निघूनही जातात. काही भागात हलकासा शिडकावा होतो, पण काळजीचे कारण नाही. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार असेच वातावरण पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असले, तरी त्यानंतर मोसमी पावसाचा जोर वाढत जाणार आहे.

केरळ ते महाराष्ट्र हा ११ दिवसांचा प्रवास करून ८ जूनला मोसमी पावसाचे राज्यात आगमन झाले. आगमनाच्या दिवशीच तो कोकण व्यापून थेट मराठवाडय़ापर्यंत पोहोचला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोसमी वाऱ्यांचा प्रवेश पुणे शहर आणि परिसरात झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या मोसमी पाऊस महाराष्ट्रात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ,  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगरचा काही भाग, मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, जालना, यवतमाळ, चंद्रपूरसह गडचिरोली व इतर भाग व्यापला आहे. सध्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, राज्याच्या अन्य भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, पुण्यात तो दाखल होऊन तीन दिवस झाले असतानाही अद्याप दमदार पाऊस होऊ शकलेला नाही.

शहरात वळिवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल होताच चांगला पाऊस होणार असे वाटत होते. ८ जूनपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. काही भागांमध्ये अगदी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. मात्र, मोसमी पावसाच्या दमदार सरींसाठी पुणेकरांना काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर आणि उपनगरामध्ये एक-दोन सरी बरसतील. तीन ते चार दिवसांनंतर पावसाचा जोर वाढत जाईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

शहरात ऊन- सावल्यांचा खेळ

तीन ते चार दिवस सकाळपासून शहरात बहुतांश ठिकाणी ढग दाटून येतात. मात्र, काही वेळातच ते निघून जात उन्हाचा कडाका जाणवतो. त्यामुळे दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवास येत आहे. सोमवारीही तशीच स्थिती होती. शहरात सध्या थंड वारे येत असल्याने हवेत किंचित गारवा असला, तरी ढगाळ वातावरण दूर होताच उन्हाचे चटके बसू लागतात. शहरात सोमवरी ३२.० अंश सेल्सिअस कमाल आणि २४.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले असल्याची माहिती वेधशाळेने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:37 am

Web Title: monsoon in pune
Next Stories
1 परताव्याचे जुनेच पर्याय कायम
2 पिंपरीत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट!
3 पुलंचे ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटक पुन्हा रंगमंचावर
Just Now!
X