नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अजूनही श्रीलंकेजवळच रेंगाळला आहे. तो केरळात कधी दखल होणार याची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, राज्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह काही भागात शुक्रवारी व शनिवारी पावसाच्या सरी पडल्या.
मान्सूनचे अंदमान समुद्रातील आगमन नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच म्हणजे १६ तारखेला झाले. त्यानंतर तो वेगाने पुढे सरकला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तो ३० मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, सध्या त्याला पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नाही. तो अजूनही श्रीलंकेजवळच थांबला आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोकण व दक्षिण महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी ढगाळ वातावरणात वादळी पाऊस पडला. शुक्रवारी सांगली येथे ४५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय सातारा (१८.७), कोल्हापूर (३७.८), पुणे (१.२), रत्नागिरी (३.७), नगर (१), सोलापूर (९.२), औरंगाबाद (०.२) येथेही पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभरात पुणे वेधशाळेत ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.