News Flash

पंधरा दिवसांत मान्सून भारतात

‘आयएमडी’ने २००५ पासून मान्सून केरळमध्ये येण्याच्या तारखेचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली

संग्रहित छायाचित्र

३० मे रोजी केरळची वेस ओलांडणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) केरळमध्ये ३० मे रोजी आगमन होण्याची शक्यता ‘भारतीय हवामान विभागा’ने (आयएमडी) वर्तवली आहे. सर्वसाधारणत: १ जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो, परंतु गतवर्षी त्याचे केरळमध्ये सात दिवस उशिरा आगमन झाले होते. यंदा मात्र मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच्याच जवळची असेल, असा दिलासा निर्माण झाला आहे.

‘आयएमडी’ने २००५ पासून मान्सून केरळमध्ये येण्याच्या तारखेचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. हवामानविषयक विविध घटक लक्षात घेऊन हा अंदाज दिला जातो. त्यानुसार या वर्षी ती तारीख ३० मे असण्याची शक्यता आहे. अंदाजासाठी वापरलेल्या प्रारूपाचा विचार करता यात चार दिवस अलीकडे किंवा पलीकडे होऊ शकतात. सध्या नैर्ऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या उर्वरित भागात मान्सूनने मार्गक्रमण केले असून त्याच्या पुढच्या प्रवासासाठीही परिस्थिती अनुकूल आहे.

दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा तीन दिवस आधीच दक्षिण अंदमान समुद्र व निकोबार बेटांवर येऊन पोहोचला. असे झाल्यावर केरळात आणि महाराष्ट्रातही मान्सूनचे लवकर आगमन होणार का, हा नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो. परंतु मान्सून अंदमानात येण्याची तारीख आणि पुढे तो केरळमध्ये येण्याच्या तारखेचा थेट संबंध नसतो. तसेच मान्सून लवकर किंवा उशिरा येण्याचा व पाऊस कमी-जास्त पडण्याचाही संबंध नसतो. मान्सून एकदा केरळमध्ये आला, की देशातील त्याच्या पुढच्या प्रवासाविषयीचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे वर्तवता येतो, असे हवामानतज्ज्ञ सांगतात.

मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख सर्वसाधारणपणे १ जून असली, तरी प्रत्यक्षात दरवर्षी तो १ जूनलाच येतो असे नाही. गेल्या काही वर्षांसाठी ‘आयएमडी’ने वर्तवलेला अंदाज आणि प्रत्यक्षात मान्सूनचे केरळमध्ये झालेले आगमन याच्या तारखा खालीलप्रमाणे-

 

वर्ष    प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये आल्याचा दिवस               ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार तारीख

२०१२        ५ जून                                                                             १ जून

२०१३        १ जून                                                                             ३ जून

२०१४        ६ जून                                                                             ५ जून

२०१५        ५ जून                                                                             ३० मे

२०१६        ८ जून                                                                             ७ जून

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:22 am

Web Title: monsoon likely to hit india in fifteen days
Next Stories
1 दलित चळवळीतील तारा निखळला : रामदास आठवले
2 लग्नात पाहुणे मंडळींचा पेरूच्या रोपांनी मान-पान
3 पुण्यातील इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Just Now!
X