पुणे आणि परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे, तसेच सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जून महिना निम्मा सरत आला तरी पुण्यात अजून सलग पावसाचे आगमन झालेले नाही. सध्या पुण्यातील हवामान ढगाळ असून, वेधशाळेने पुढच्या सहा दिवसांसाठी दिलेल्या हवामानाच्या अंदाजात रोजच पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारीही पावसाच्या काही सरी पडू शकतील. पुढच्या आठवडय़ात मंगळवार ते गुरुवार या कालावधीत देखील अधूनमधून पावसाच्या सरींचा अंदाज आहे.

मोसमी पाऊस पुढे सरकला..

बंगालच्या उपसागरातून पुढे आलेल्या मोसमी वाऱ्यांमुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू झाला असून आंध्र प्रदेश आणि प. बंगालच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय ओरिसा, झारखंड व बिहारच्या काही भागांतही मोसमी पावसाने धडक मारली आहे. राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी येत असून पावसाचा प्रभाव रविवारी वाढेल. राज्याच्या बहुतांश भागांत येत्या दोन दिवसांतमोसमी पाऊस पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. साधारण १० जूनला येणारा मोसमी पाऊस यावेळी आठवडय़ाहून अधिक विलंबाने दाखल होत आहे.  अरबी समुद्रावरील मान्सूनचा प्रभाव कमी असला तरी बंगालच्या उपसागरावरून आलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने ही कसर भरून काढली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार शनिवारी व रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व विदर्भात मुसळधार पाऊस अपेक्षित असून उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या सरी येतील.