08 March 2021

News Flash

पुण्यात आजचा दिवस पावसाचा!

धरणांच्या एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत हा आकडा ५२ टक्क्य़ांच्या आसपास आहे. शुक्रवारी धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

| August 14, 2015 03:30 am

पावसाळा सुरू असला तरी पुण्यात पावसाचे दिवस मोजायची वेळ आली आहे. काही दिवसांचे अपवाद वगळता पावसाने गेले दीड महिने दडी मारली आहे. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी पुण्यात पाऊस पडला आणि शुक्रवारीसुद्घा (१४ ऑगस्ट) बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पावसाच्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात या हंगामात पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत तब्बल ९८ मिलिमीटरने कमी आहे.
या पावसाळ्यात राज्याच्या सर्वच भागात पावसाने निराशा केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातही पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या दीड-पावणेदोन महिन्यांत मोजकेच दिवस पावसाचे ठरले आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता, १ जूनपासून १३ ऑगस्टपर्यंत पुणे वेधशाळेत केवळ २८३ .४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या काळात पुण्यात सरासरी ३८१.४ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. म्हणजेच पुण्यात या वेळी पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत ९८ मिलिमीटरने कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पुढच्या दीड-दोन महिन्यांत काही दिवस दमदार पाऊस पडावा लागेल.
पुण्यात सध्या पावसासाठी पूरक स्थिती आहे. गुरुवारी दिवसभरात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजीसुद्धा पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, पावसाचा जोर कमी होईल. त्यानंतर पुढच्या आठवडय़ात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. त्याचे प्रमाण कसे असेल हे सांगण्यासाठी मात्र वाट पाहावी लागेल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे अधिकारी डॉ. पीसीएस राव यांनी दिली.
पुण्यातील धरणांच्या क्षेत्रातही सध्या विशेष पाऊस पडत नाही. गुरुवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या क्षेत्रात एकही मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही. मात्र, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांच्या क्षेत्रात ७ ते १५ मिलिमीटर पाऊस पडला. पावसाने ओढ दिल्यामुळे पुण्यासाठीच्या या चारही धरणांमध्ये मिळून केवळ १५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणांच्या एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत हा आकडा ५२ टक्क्य़ांच्या आसपास आहे. शुक्रवारी धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘‘पुण्यात या हंगामात कमी पाऊस पडला आहे. ही तूट भरून निघण्यासाठी काही दिवस तरी चांगला पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. मात्र, पावसाळ्याचे दीड महिने अजून बाकी आहेत. त्यामुळे या काळात किती पाऊस पडतो हे पाहावे लागेल.’’
– डॉ. पीसीएस राव, पुणे वेधशाळा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 3:30 am

Web Title: monsoon rain dam water level
टॅग : Dam,Monsoon
Next Stories
1 सरकार सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी – चंद्रकांत पाटील
2 पुणे शहर वाहतुकीची प्रयोगशाळा!
3 मार्सेलिस येथील सावरकर स्मारकास केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Just Now!
X