पुणे शहरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुमारे साडेचारशे मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते, या वेळी प्रत्यक्षात ३०० मिलिमीटरही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पावसामध्ये तब्बल दीडशे मिलिमीटरची तूट असून, पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच आणखी महिन्याभरात ती भरून निघणार का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, पुण्यातील धरणांचा साठा अजूनही केवळ ५० टक्क्य़ांच्या आसपासच कायम आहे.
पुण्यात चांगल्या पावसाने दोन महिन्यांहून जास्त काळाची उघडीप दिली. त्यामुळे संपूर्ण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नाममात्र पाऊस पडला. त्याचा परिणाम म्हणून पावसाची तूट वाढत गेली. आतापर्यंत ती १४६ मिलिमीटरवर गेली आहे. पुणे वेधशाळेत १ जून ते १ सप्टेंबर या काळात ४४३.८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. या वेळी केवळ २९८.१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली. ही तूट भरून निघण्याची लगेच तरी शक्यता नाही, कारण आता पुढील काही दिवसांसाठी पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेरीस पावसाळा अधिकृतरीत्या संपेल. त्यामुळे ही तूट भरून निघणार का, याबाबत शंका आहेत.
धरणे निम्म्यावर
पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील मिळून उपयुक्त साठा अजूनही निम्म्यावरच आहे. त्यामुळे पाण्याची मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढे पाऊस पडला तरी धरणांमधील तूट भरून निघणे कठीण असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभ्यासक सांगत आहेत. सध्या या चार धरणांमध्ये मिळून १४.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठय़ाच्या तुलनेत हे प्रमाण ५०.२९ टक्के इतकेच आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी पुरवणाऱ्या पवना धरणात ६.६४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत हे प्रमाण ७५.६९ टक्के इतके आहे.
पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा
धरणाचे नाव, मंगळवारचा पाऊस, १ जूनपासूनचा पाऊस, उपयुक्त पाणीसाठा, टक्केवारी या क्रमाने
(पावसाचे आकडे मिलिमीटरमध्ये, धरणसाठा टीएमसीमध्ये) :
खडकवासला            ०                ४०२                    ०.६४            ३२.१९
पानशेत                   ०                १२१०                    ६.४६            ६०.६२
वरसगाव                 ०                १२२१                   ५.९६            ४६.५०
टेमघर                     ०                १७१९                    १.६१            ४३.३२
एकूण                                                                     १४.६६        ५०.२९
…….
पवना                       ०                १४०८                ६.४६            ७५.६९