मोसमी पाऊस अवघ्या दोन दिवसांत केरळमधून महाराष्ट्रात

पुणे : दोनच दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी पावसाने द्रुतगती प्रवास करीत विक्रमी वेळेत महाराष्ट्र गाठला. मोसमी वाऱ्यांनी कोकणसह मध्य महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे. पुढील चोवीस तासांत पाऊस महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

अंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांचा प्रवास काहीसा रखडला होता. त्यामुळे केरळमध्ये दाखल होण्याची नियोजित वेळ त्यांनी चुकविली होती. १ जूनऐवजी ते ३ जूनला केरळमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे आता मोसमी वारे महाराष्ट्रात कधी पोहोचणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. केरळला पोहोचण्यापूर्वी एक दिवस आधी पोषक स्थितीमुळे त्यांचा वेग वाढला होता. त्यामुळे तीन-चार दिवसांचा प्रवास करून ते ६ किंवा ७ जूनला महाराष्ट्रात प्रवेश करतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोसमी वाऱ्यांनी मोठी प्रगती केली. केरळ आणि लक्षद्विपचा सर्व भाग त्यांनी व्यापला होता. कर्नाटक किनारपट्टी आणि अंतर्गत भागातही प्रगती करून तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी प्रवेश केला होता.

महाराष्ट्राच्या जवळ उत्तरेकडून प्रगती करीत मोसमी वारे ४ जूनला कर्नाटकच्या कारवारपर्यंत आले होते. त्यानंतरही त्यांची द्रुतगती सुरूच होती. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करीत मोसमी वारे विक्रमी वेळेत ५ जूनलाच महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

पाऊसभान…

मोसमी वाऱ्यांनी राज्यातील सहा जिल्ह्यांचा भाग व्यापला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिाम-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरपर्यंत त्यांनी मजल मारली. पुणे जिल्ह्याच्या वेशीवर ते येऊन ठेपले आहेत.

पुढील चोवीस तासांत…

’या सर्व विभागांत शनिवारी पावसाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मोसमी वारे प्रगती करू शकतात.

’याच कालावधीत संपूर्ण कर्नाटक आणि तमिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि तेलंगणातील काही भाग ते व्यापणार आहेत.