लवकर येण्याची चाहूल निर्माण करीत नंतर विविध कारणांनी स्थिरावलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असलेला मान्सून, सुधारित अंदाजानुसार तिथे ५ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सून सामान्यत: १ जूनच्या सुमारास केरळच्या किनाऱ्यावर दाखल होतो. सध्या दक्षिण अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. तसेच, लक्षद्वीप, दक्षिण भारत येथील पावसाचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत सुधारित अंदाज जाहीर केला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन अजूनही झालेले नाही. तो श्रीलंकेच्या जवळपास रेंगाळला आहे. या पाश्र्वभूमीवर हवामान विभागाने सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार मान्सून केरळच्या किनाऱ्यावर ५ जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.
आणखी ९० बळी
आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओदिशात उष्माघाताने आणखी ९० जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त असून संपूर्ण देशभरातील मृतांची संख्या आता २,३३८ च्या घरात गेली आहे. दरम्यान, राजधानीत सोमवारी ढगाळ आकाश होते आणि काही प्रमाणात पाऊसही पडल्यामुळे दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला. पंजाब व हरयाणातही काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे तेथील तापमानात घट झाली होती.