15 July 2020

News Flash

मोसमी पावसाचे आनंदघन केरळात!

अरबी समुद्रातील घडामोडींमुळे लवकरच महाराष्ट्रात

संग्रहित छायाचित्र

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी नियोजित वेळ साधलीच. अरबी समुद्रातील मोठा टप्पा पार करून सोमवारी (१ जून) ते आनंदघन घेऊन केरळात दाखल झाले आणि मनसोक्त बरसले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे वेगवान झाले आहेत. हाच वेग कायम राहिल्यास ते दोन ते तीन दिवसांत तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

बंगालच्या उपसागरामध्ये अम्फान चक्रीवादळाची निर्मिती झाल्याच्या कालावधीत अंदमानच्या समुद्रात मोसमी वाऱ्यांची चाहुल लागली होती. १७ मे रोजी त्यांनी अंदमान समुद्राचा काही भाग आणि निकोबार बेटांवर प्रवेश करून भारतीयांना सुवार्ता दिली होती. नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच ते या भागात पोहोचले होते. चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने रवाना झाल्यानंतर त्यांनी तब्बल दहा दिवसांची विश्रांती घेतली. बाष्पाचा पुरवठा आणि पोषक वातावरणाची स्थिती नसल्याने ते तेथे रेंगाळले. मात्र, २७ मेनंतर समुद्रात पुन्हा घडामोडी निर्माण झाल्या. बंगालच्या उपसागरातून चालना मिळण्याबरोबच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. परिणामी वाऱ्यांच्या प्रवासाला वेग मिळाला. चार दिवसांत अंदमानचा समुद्र आणि अरबी समुद्राचा बहुतांश भाग ओलांडत ते १ जूनला केरळमध्ये दाखल झाले.

मोसमी पाऊस आता केरळमध्ये स्थिरावला असून, तेथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तमिळनाडूच्या काही भागापर्यंतही त्यांची प्रगती झाली आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला सध्या तरी अत्यंत पोषक स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये ते कर्नाटक ते गोवा त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तळकोकणापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चक्रीवादळ राज्यात धडकण्याची चिन्हे

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून, पुढील चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्राला धडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमनच्या दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकण, मुंबईपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई परिसरात शिडकावा

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटे काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दादर-माटुंगा परिसर आणि गोरेगाव येथे काही ठिकाणी सुमारे २० ते ४० मिमी पाऊस पडला. जुहू येथे ५ ते १० मिमी पाऊस झाला, तर दक्षिण आणि मध्य मुंबई, चेंबूर, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, नवी मुंबईत कोपरखैराणे, बेलापूर येथे १ ते ५ मिमी पावसाची नोंद झाली.

यंदा सरासरीइतका पाऊस

नवी दिल्ली : यंदा सरासरी इतका मोसमी पाऊस होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सोमवारी दिली. मोसमी पाऊस सुरू होण्याआधी हवामान खात्याकडून दरवर्षी दोन अंदाज व्यक्त केले जातात. केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होताच यंदाच्या पावसाळ्याचा दुसरा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १०२ टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. या अंदाजामध्ये चार टक्के कमी-अधिक फरकाची शक्यताही गृहित धरलेली असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:23 am

Web Title: monsoon rains in kerala abn 97
Next Stories
1 चिंचेचा हंगाम वाया;शेतकऱ्यांना फटका
2 शिक्षण क्षेत्रात नाराजी
3 Coronavirus: पुण्यात दिवसभरात आढळले ५७ करोनाबाधित रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
Just Now!
X