गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला हुलकावणी देत असलेला मान्सून अखेर शनिवारी राज्यात दाखल झाला . पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी ही माहिती दिली. मात्र, यंदा मान्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी वेगळी वाट चोखाळल्याचे दिसत आहे. नेहमी अरबी समुद्रातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या मान्सूनने यंदा बंगालच्या उपसागरातून राज्यात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भ हा यंदा राज्यातील मान्सूनच्या आगमनाचे प्रवेशद्वार ठरला आहे. पूर्व किनारपट्टीवर वातावरणात झालेल्या बदलांमुळे मान्सूनने यंदा पूर्व विदर्भामार्गे महाराष्ट्रात एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, मान्सूनचे हे वारे येत्या ४८ तासांत महाराष्ट्रभर पसरतील, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रातूनही मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.