पुण्यातील धरणांच्या परिसरात पावसाने गेली तीन आठवडे ओढ दिल्यामुळे पाणीसाठय़ात हळूहळू घट होऊ लागली आहे. पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये २४ टक्क्य़ांपेक्षा जास्त साठा शिल्लकअसल्याने अजूनही तरी स्थिती चिंताजनक बनलेली नाही. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणातही अजून ३८ टक्के पाणी उपलब्ध आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखी आठवडाभर तरी मोठय़ा पावसाची शक्यता नाही. त्यामुळे नजीकच्या काळात तरी धरणांमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.
पावसाने ओढ दिल्यामुळे राज्याच्या सर्वच भागात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील धरणांच्या क्षेत्रात जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे शहराला फारशी चिंता नाही. अशीच स्थिती पिंपरी-चिंचवड शहराचीही आहे. मात्र, गेली तीन आठवडे विशेष पाऊसच झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. अजूनही पुण्यासाठीच्या चार धरणांमध्ये एकूण ७ अब्ज घनफूटपेक्षा (टीएमसी) जास्त पाणी उपलब्ध आहे. पवना धरणात ३.२७ टीएमसी पाणी आहे.
पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांमधील साठा :
धरणाचे नाव      पाणीसाठा (टीएमसी)      टक्केवारी     १ जून पासूनचा पाऊस (मिमीमध्ये)
खडकवासला                ०.२६                            १२.९९             २९४
पानशेत                       ४.२७                           ४०.०५             ६२७
वरसगाव                     २.४१                            १८.७६             ६२२
टेमघर                          ०.१४                             ३.७५            ८३२
एकूण                            ७.०७                           २४.२४               —
(पिंपरी-चिंचवडसाठीचे धरण)
पवना                            ३.२७                           ३८.३७               ५५७

‘सध्या तरी चिंता नाही’
‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी गेल्या वर्षांच्या तुलनेत सध्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडला नाही, तरी चिंता करण्याचे कारण नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ तारखेनंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शहरांपुरती तरी बिकट परिस्थिती येण्याची शक्यता नाही.’’
– श्री. सुरूशे, मुख्य अभियंता, कृष्णा खोरे