‘मुचकुंद’ या पात्राच्या कथेद्वारे निसर्गाशी मैत्री राखण्याचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी बाळगोपाळांना केलेले आवाहन.. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी अक्कड आणि फक्कड यांची गमतीशीर गोष्ट.. व्यासपीठावरून कथांचे सादरीकरण होताना बालकुमारांना गोष्टीमागची गोष्ट शनिवारी उलगडली आणि या अनोख्या कथांच्या माध्यमातून ज्येष्ठांनी बालचमूंशी संवाद साधला.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि संवाद पुणे यांच्यातर्फे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात प्रथम बुक्सने प्रकाशित केलेल्या डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘मुचकुंद’ या मराठी आणि इंग्लिश भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. प्रमोद आडकर, चंद्रकांत इंदुरे, संध्या टाकसाळे आणि सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
मधमाश्यांची पोळी जाळू नये, हा संदेश गाडगीळ यांनी मुचकुंद या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दिला. मधमाश्यांची पोळी न जाळताही मध मिळण्याची अनोखी पद्धत शास्त्रज्ञ गोपाळ पालीवाल यांनी शोधून काढली आहे. त्याला त्यांनी अहिंसक मध असे नाव दिले आहे. आदिवासींच्या आश्रमशाळेत हे पुस्तक पोहोचले, तर मधमाशा या देखील सुरक्षित राहतील. निसर्गाशी मैत्री ठेवून आपणही निरोगी राहू यात असे गाडगीळ यांनी सांगितले.
अक्कड आणि फक्कड यांना घडलेली स्वर्गाची सफर, स्वर्गामध्ये त्यांनी केलेल्या गमतीजमती आणि तेथून परतल्यावर घरामध्ये लपवून ठेवलेला हा अनुभव अशी गोष्ट अनिल अवचट यांनी सांगितली. चंद्रकांत इंदुरे यांनी मुलांकडून गाणी म्हणून घेतली. संध्या टाकसाळे यांनी सूत्रसंचालन केले.