भावाला केलेली करणी काढतो म्हणून एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाने आणखी काहीजणांना फसविल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. नागरिकांनी याबाबत पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन डेक्कन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अतुल अप्पासाहेब शितोळे ऊर्फ अतुल महाराज (वय ३३, रा. गंगा अपार्टमेन्ट, चौथा मजला, विवेकनगर, आकुर्डी) यास अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी सोळा वर्षांच्या पीडित मुलीने तक्रार दिली आहे. त्यावरून या भोंदूबाबाच्या विरुद्ध बलात्कार, फसवणूक, धमकाविणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाने त्याच्या धार्मिक सीडी तयार करून बीड येथील एका मंदिरात आणि दिवे घाट येथील मंदिरात ठेवल्या होत्या. त्या सीडीच्या माध्यमातून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांची किंवा नागरिकांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.