पुणे : गेला आठवडाभर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्य़ात दररोज १०० पेक्षा अधिक करोनाग्रस्त सापडत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. तातडी नसेल तर घराबाहेर पडू नका, ज्यांना घराबाहेर पडणे अत्यावश्यक आहे, त्यांनी सर्वतोपरी खबरदारी घ्या आणि परिस्थितीचे गांभिर्य ठेवा, असे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

सहा मे पासून पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येने दररोज शंभरीच्या पलीकडे जाण्यास सुरुवात केली. सहा मे या दिवशी ९९ नव्या रुग्णांची जिल्ह्य़ात नोंद झाली. सात मे – १६१, आठ मे – १११, नऊ मे – १६० रुग्ण जिल्ह्य़ात सापडले. १० मे – १२५, ११ मे – ११२ तर १२ मे या दिवशी सर्वाधिक १६५ रुग्ण आढळून आले आहेत. रोज शंभरीपार जाणारी ही रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणांची कसोटी पाहणारी ठरत असतानाच दुसरीकडे नागरिक मात्र टाळेबंदीतील शिथिलतेचा गैरफायदा घेऊन रोज घराबाहेर पडताना दिसत आहेत,   नव्या रुग्णांची संख्या कधी आणि कशी आटोक्यात येणार, हा प्रश्न आहे. महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, मागील आठवडाभरात करोनासाठी आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, त्यामुळे अधिकाधिक रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. जितक्या चाचण्या अधिक तेवढी रुग्णसंख्या अधिक हे समीकरण आहेच.  येत्या काळात हे प्रमाण असेच वाढते राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, अधिकाधिक रुग्ण सापडून ते विलगीकरण आणि उपचारांसाठी येत असल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखणे शक्य होत आहे, याचे समाधान वाटते.

नागरिकांमध्ये गांभीर्याचा अभाव

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, शहरातील टाळेबंदीत काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर रस्त्यावर दिसणारी गर्दी ही आपण अद्याप करोनाबाबत गंभीर नसल्याचा पुरावा आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अजूनही वाढणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्या नागरिकांना आपल्याला संसर्ग होऊ नये असे वाटत असेल त्यांनी शक्य तेवढे घरात राहावे. मास्क, सॅनिटायझर, हात धुणे, स्वच्छता ही पथ्ये पाळावीत. कारण अद्याप करोनाचे संकट दूर झालेले नाही.