विद्यापीठातील प्रवेशासाठी चुरस

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीच्या ५ हजार ६५३ जागांसाठी एकू ण २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शैक्षणिक विभागांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. २०२०-२१साठीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज के ले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश क्षमता ३ हजार ३५३ आहे. त्यासाठी २२ हजार ४६७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २ हजार ३०० असून, त्यासाठी २६५० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.

१६ ऑगस्टला प्रवेश परीक्षा

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम (बी.व्होक), लिबरल आर्ट्स?, संगीत, नृत्य, नाटक, बी. टेक एव्हिएशनसह अन्य पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातर्फे येत्या १६ ऑगस्टला ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या लॅपटॉप, संगणक वा स्मार्टफोनद्वारे देता येईल. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

विद्याशाखा                                 अर्ज संख्या             प्रवेशाची क्षमता

विज्ञान आणि तंत्रज्ञान                १७ हजार १०४           १ हजार ३४२

वाणिज्य व व्यवस्थापन            १ हजार १४४                   २२०

मानव विज्ञान                           ४ हजार ३७४             १ हजार १७५

आंतरविद्याशाखीय अभ्यास       १ हजार ८५६                   ६१६

पदविका व प्रमाणपत्र                   ३ हजार ३०९             २ हजार ३००

एकूण अर्जाची संख्या                २७ हजार ७८७           ५ हजार ६५३