लष्करात असल्याचे सांगून ५३ तरुणींची फसवणूक कराणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. योगेश दत्तू गायकवाड ( वर्ष २७ ) डोंगरगाव, तालुका कन्नड असे मुख्य आरोपीचे नाव आहे. यासोबत संजय ज्ञानोबा शिंदे, केडगाव जिल्हा अहमदनगर या त्याच्या साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. योगेश दत्तू याने चार तरुणीशी लग्न देखील केले. तसेच त्यांच्या नात्यातील तरुणांना लष्करात कामाला लावतो, असे सांगून तब्बल ४० हून अधिक तरुणांची ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीकडून लष्कराचे कपडे, खोटे शिक्के, बनावट बिल्ले, टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या टोप्या तसेच खोटी जॉइनिंग लेटर्स व एक चारचाकी गाडी, दोन दुचाकी गाड्या असा एकूण ५,४१,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

४० हून अधिक जणांनी लष्करात भरती करण्यासाठी दिली रक्कम

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील एक तरुणी बस स्टॉपवर थांबली होती. तेव्हा तिथे तिला आधार कार्ड सापडले. तेथून काही अंतरावर असलेल्या एक तरुणाचे असल्याचे तिच्या लक्षात आले. तेव्हा तिने त्या तरुणाला कार्ड दिले. मी लष्करात असून आपल्याला काही मदत लागल्यास सांगा. त्या दरम्यान दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर आरोपी योगेश दत्तू गायकवाडने तरुणीला सतत फोन करुन ओळख वाढविली. सैन्यातील गणवेषातील फोटो, तिला त्याने शेयर केले. यामुळे पीडित तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या आईचा देखील विश्वास संपादन केला. काही दिवसात आरोपीने पीडिते सोबत लग्न केले.

काही दिवसांनी पीडितेच्या भावाला लष्करात कामाला लावण्यास २ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर हीच माहिती पीडितेच्या भावाने त्याच्या मित्रांना सांगितली. त्याच्याकडे जवळपास ४० हून अधिक जणांनी लष्करात भरती करण्यासाठी रक्कम दिली. ही सर्व मिळून ५० ते ६० लाखांच्या घरात गेली. त्यानंतर आरोपीने सर्वांना रुजू करण्यात येत असल्याचे पत्रक दिले. त्यानंतर तेथून आरोपी निघून गेला.

आरोपी तब्बल ५३ तरुणींच्या संपर्कात

ऑर्डर मिळाली मात्र पुढे काही प्रक्रियाचं होत नसल्याने सर्व तरुणांनी आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे तरुणांना समजले. त्यानंतर पीडित तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तपास सुरू होता. तेवढ्यात आरोपी औरंगाबाद येथे एका तरुणी सोबत राहत असल्याची माहिती पोलिसांमा मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच आरोपीला साथ देणार्‍या एका अन्य आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे चौकशी केल्यावर, त्याने चार तरुणीनी सोबत लग्न केल्याचे सांगितले. त्यापैकी एका पत्नीला मुलगा आहे. तसेच आरोपी तब्बल ५३ तरुणींच्या संपर्कात आहे. रस्त्यावर एकट्या दिसणार्‍या तरुणाशी संवाद साधून त्यांची देखील फसवणूक केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. त्याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.