News Flash

उत्पादनांना मागणी असूनही पाचशेहून अधिक लघुउद्योग बंद

उद्योगांना परवानगी; पण कच्चा माल मिळत नसल्याने फटका

उद्योगांना परवानगी; पण कच्चा माल मिळत नसल्याने फटका

पिंपरी : करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा आणि उद्योगांना वगळण्यात आले असून त्यानुसार िपपरी, भोसरी आणि चाकण परिसरातील उद्योग सुरू आहेत. मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने सरकारच्या आदेशामुळे बंद असल्याने कारखानदारांना कच्चा माल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्याचा फटका मोठय़ा कारखान्यांसह लघुउद्योजकांना बसला असून उत्पादनांना मागणी असूनही पाचशेहून अधिक लघुउद्योग बंद आहेत. तसेच दीड हजार कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे.

पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त लघुद्योग आहेत. यामध्ये सुमारे पाच लाख कामगारांना रोजगार मिळतो. राज्यातील उद्योग सुरू रहावेत, कामगारांचा रोजगार बुडू नये, त्यांचा संसाराचा गाडा चालावा यासाठी सरकारने लघुउद्योगांना टाळेबंदीतून वगळले आहे. त्यामुळे उद्योग सुरू आहेत. मात्र, सरकारने लघुउद्योगांना कच्चा माल पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मोठय़ा कारखान्यांकडून काही प्रमाणात उत्पादनांची मागणी केली जात असली तरी कारखानदारांना आणि लघुउद्योजकांना कच्चा माल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. करोना रुग्णांना प्राणवायू पुरवठा कमी पडत असल्याने प्राणवायूवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांना प्राणवायू देण्यास सरकारने बंधन घातले आहे. त्यामुळे ते कारखाने बंद आहेत, त्यांची संख्याही मोठी आहे.

गतवर्षीच्या टाळेबंदीमुळे कर्जबाजारी झालेले कारखानदार यंदाही मेटाकुटीला आले आहेत. अनेक कारखान्यांना मोठय़ा उद्योगांकडून उत्पादनाची मागणी होत नसल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. कामगारांना घरी बसविले तर निम्मा पगार द्यावा लागेल, या भीतीपोटी कामगारांना कारखान्यात बोलावून छोटी मोठी कामे देण्यात येतात. कारखान्यांमध्ये काम नसल्याने बहुतांश कामगार बसून असतात. कारखाने बंद असले तरी कारखानदारांना विविध कर द्यावे लागतात. त्यामुळे कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, कारखान्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या दुकानांना परवानगी नाही. त्यामुळे लघुउद्योगांना सुटे भाग मिळत नाहीत. परिणामी अनेक कारखाने बंद आहेत. तर बहुतांश कारखान्यांच्या उत्पादनामध्ये साठ ते सत्तर टक्के घट झाली आहे.

दिलीप भटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिज

कच्चा माल पुरविणारी दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम उद्योगांवर झाला आहे. तसेच मोठय़ा उद्योगांकडून छोटय़ा उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांना मागणी नसल्याने आर्थिक उलाढाल आणि उत्पादनामध्ये घट झाली आहे.

अनिल सोमवंशी, लघुउद्योजक, चिखली.

राज्य सरकारने उत्पादित मालाची निर्यात करणाऱ्यांना परवानगी दिली आहे. लघुउद्योगांना कच्चा माल पुरवठा करणाऱ्या दुकानदारांनाही परवानगी दिलेली असताना दुकाने उघडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याचा परिणाम त्यांच्याकडून दुकाने बंद ठेवली जातात. त्यामुळे लघुउद्योगांना कच्चा माल मिळत नाही. कच्चा माल मिळत नसल्याने पन्नास टक्के उत्पादन घटले आहे.

संदीप बेलसरे, अध्यक्ष, लघुउद्योजक संघटना, पिंपरी-चिंचवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 1:24 am

Web Title: more than 500 small scale industries shut down despite products demand zws 70
Next Stories
1 निर्बंध शिथिल झाल्यावरच ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया
2 जगातील दोन हजारांमध्ये राज्यातील सहा शिक्षण संस्था
3 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा बासमतीला फटका
Just Now!
X