गुंतवणूकदारांची आयुष्यभराची पुंजी पणाला

पुणे : ठेवींवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. अनेकजणांनी आयुष्यभराची पुंजी जादा व्याजदराच्या आमिषाने फसव्या योजनेत गुंतविली. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये सेवानिवृत्त ज्येष्ठ बळी पडले आहेत. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात सध्या जादा व्याजदराचे आमिष दाखवून सामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शंभरहून अधिक खटल्यांवर सुनावणी सुरू आहे.

गुंतवणूकदारांच्या कोटय़वधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्याने गुंतवणूकदारही हवालदिल झाले आहेत. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीकडून झालेल्या फसवणुकीसह समृद्ध जीवन, टेम्पल रोझ, रॉयल टिंक्वल स्टार क्लब, फडणीस इन्फास्ट्रक्चर, संस्कार ग्रुप, भाईचंद रायसोनी मल्टिस्टेट संस्था (बीएचआर) यासह लहान मोठय़ा पतसंस्थांच्या योजनांत अनेकांनी जादा व्याजदराच्या आमिषाने ठेवींची गुंतवणूक केली. अशा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपींना अटकही केली. ठेवी स्वीकारल्यानंतर सुरुवातीला जादा व्याजदराने परतावा द्यायचा. त्यानंतर परतावा देण्याचे बंद करायचे. अशा पद्धतीने गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याची शेकडो उदाहरणे आहेत.

खासगी बांधकाम कंपनीसह पतसंस्थांच्या योजनांमध्ये अनेकांनी रक्कम गुंतवली होती. पतसंस्थांमधील संचालक मंडळाच्या गैरकारभारांमुळे आयुष्यभराची पुंजी पणाला लागली आहे. शेकडो ठेवीदारांचे कोटय़वधी रुपये अडकून पडले आहेत. फसवणूक प्रकरणात पोलिसांकडून महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात येतो. वित्तीय संस्थांनी गैरकारभार किंवा ठेवीदारांची  फसवणूक केल्यास आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मालमत्तेचा लिलाव करून त्यातून मिळालेली रक्क म गुंतवणूकदारांना परत केली जाते. ही सर्व प्रक्रिया विशेष न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चालते.

जोखीम घेऊ नका

एखादी वित्तीय संस्था जादा व्याजदर देत असेल तर, गुंतवणूकदारांनी योग्य विचार केला पाहिजे. त्या वित्तीय संस्थांची आर्थिक बाजू विचारात घ्यायला हवी. त्या संस्थेचे संचालक कोण आहेत, याचाही विचार करणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना जादा परताव्याच्या आमिषाने जोखीम पत्करणे धोकादायक आहे, असे निरीक्षण फौजदारी वकील अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी नोंदविले.