प्रलंबित खटले कमी करण्यासाठी राज्यातील विविध न्यायालयात कोटय़वधी रुपये खर्च करून सकाळ आणि सायंकाळची तीनशेपेक्षा जास्त न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, वकिलांचा विरोध आणि प्रशासकीय कारणांमुळे गेल्या चार वर्षांत या न्यायालयातील खटले निकाली काढण्याचे प्रमाणात कमालीची घटले असून, ही न्यायालये फक्त तारखा देण्यापुरतीच उरली आहेत.
राज्यातील विविध न्यायालयात २०१२ अखेर २९ लाख खटले प्रलंबित आहेत. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित खटले कमी करण्यासाठी देशभरात सकाळ व सायंकाळचे खटले सुरू करण्याचा आदेश दिला होता. सकाळच्या न्यायालयाचे कामकाज सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळच्या न्यायालयाचे कामकाज सायंकाळी सहा ते आठ या काळात सुरू करण्यात आले. महाराष्ट्रात सकाळची दीडशे आणि सांयकळची दोनशे न्यायालय सुरू झाली. त्यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. न्यायालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे खटले निकाली निघण्याचे प्रमाण चांगले होते. मात्र, नंतर पक्षकारांना व खटल्याची तयारी करण्यास वेळ मिळत नसल्याचे कारण देत वकिलांनी या न्यायालयास विरोध केला. नाशिक येथे झालेल्या वकील परिषदेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सकाळ आणि सायंकाळच्या न्यायालयास विरोधाचा ठराव संमत केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही न्यायालय सुरू असल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार न टाकता किरकोळ कामे यामध्ये करण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्य़ात २०१० साली उच्च न्यायालयाने सायंकाळची पाच आणि सकाळची पंधरा न्यायालय सुरू केली. पहिल्या वर्षी सकाळच्या न्यायालयात दीड हजार, तर सायंकाळच्या न्यायालयात तीन हजार खटले निकाली निघाले. मात्र, २०११ पासून सकाळ आणि सांयकाळच्या न्यायालयातील खटले निकाली निघण्याच्या प्रमाणात घट होत चालली आहे. २०१२ मध्ये सकाळच्या न्यायालयाची संख्या दोनने वाढविली तरी फक्त साडेचारशेच खटले निकाली निघाले, तर सायंकाळच्या न्यायालयाची संख्या तीनने वाढविण्यात आली. तरीही या वर्षी फक्त एक हजार खटले निकाली निघाले.

वर्ष        सकाळ न्यायालय    निकाली खटले    सायंकाळ न्यायालय    निकाली खटले
२०१०                ५                   १४७६                               १५            ३११३
२०११                ५                     ६८७                                १३            २५९२
२०१२                ६                     ४७८                                १८            १००५
२०१३                ८                      ३६६                               १४            १४८ (जूनपर्यंत)

नवोदित वकिलांसाठी फायद्याची
सकाळ आणि सायंकाळच्या न्यायालयात छोटी आणि किरकोळ प्रकरणे चालत असल्यामुळे वरिष्ठ आपल्या शिकाऊ वकिलांना या ठिकाणी पाठिवतात. त्यामुळे या शिकाऊ वकिलांना न्यायाधीशांच्या समोर युक्तिवाद करण्यास मिळतो. न्यायालयीन कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेता येत असल्यामुळे या शिकाऊ वकिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळची न्यायालये ही शिकाऊ वकिलांसाठी फायद्याची आहेत, अशी भावना नवोदित वकिलांनी व्यक्त केली.  

अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य)
सकाळ आणि सायंकाळच्या न्यायालयांना महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचा पहिल्यापासून विरोध आहे. सकाळी आणि संध्याकाळी वकिलांना खटल्यांची तयारी, पक्षकारांना भेटून माहिती घ्यायची असते. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या न्यायालयात काम करणे अवघड जाते. मात्र, ज्या वकिलांना वेळ आहे. त्यांनी जाण्यास काहीच हरकत नाही. फक्त सर्व वकिलांना या न्यायालयात जाणे सक्तीचे करू नये ही बार कौन्सिलची भूमिका आहे. नवोदित वकिलांना ही न्यायालय निश्चित फायद्याची आहेत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी या न्यायालयात जाऊन काम करावे.