परदेश प्रवासाचे रुग्ण सर्वात कमी

पुणे : पुणे, पिंपरी आणि परिसरातील करोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांना बाधित व्यक्तींच्या संपर्कातूनच करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या एकत्रित अहवालातून या बाबतची माहिती समोर आली आहे. सहा एप्रिलपर्यंत पुणे जिल्ह्य़ात आढळलेल्या १४२ रुग्णांपैकी १२० रुग्णांना बाधित व्यक्तींच्या संपर्कातून करोनाची लागण झाली आहे.

परदेश प्रवास करून आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांना करोना विषाणू संसर्गाचा धोका सर्वाधिक असल्याचे आरोग्य यंत्रणांकडून वेळोवेळी सांगण्यात आले. त्याचेच प्रतिबिंब पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिसून येत आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा मिळून सोमवार (६ एप्रिल) पर्यंत १४२ रुग्णांना करोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी १२० म्हणजे तब्बल ८४.२९ टक्के रुग्ण बाधित व्यक्तींच्या संपर्कातून लागण झालेले आहेत. उर्वरित २२ रुग्णांना परदेश प्रवासाचा इतिहास आहे. त्यांपैकी आठ रुग्ण दुबईहून, दोन रुग्ण फिलिपिन्सहून, तीन रुग्ण अमेरिकेहून आलेले आहेत. अबुधाबी, थायलंड, द. आफ्रिका, अमेरिका, कतार, लंडन, आर्यलड, स्कॉटलंड, नेदरलँड आणि जपान येथून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला करोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. हे प्रमाण अत्यल्प असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे, त्यामुळे बाधित व्यक्तींमार्फतच हा संसर्ग पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून एकमेकांच्या संपर्कात कमीत कमी येण्याची काळजी नागरिकांनी घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.