रस्त्यावरील वर्दळ पूर्ववत होण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आवाहन

पुणे : शहरातील करोना रुग्णांची संख्या दररोज शंभरच्या आसपास वाढत असतानाच आता महापालिकेतर्फे टाळेबंदीत घालण्यात आलेले बहुतांश निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रस्त्यावरील वर्दळही आता पूर्ववत होताना दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील ५० दिवसांहून अधिक काळ शहरात टाळेबंदीचे वातावरण आहे, मात्र तरीही पुणे शहरातील रुग्णवाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. निर्बंध लागू असतानाची परिस्थिती विचारात घेता ते सैल केल्यानंतर नेमकी काय परिस्थिती ओढवेल याचा अंदाज लावला असता ते भीतिदायक आहे. त्यामुळेच जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी मात्र शक्य तेवढी खबरदारी घेऊनच बाहेर पडावे. वारंवार साबण लावून हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, घराबाहेर पडताना मुखपट्टी वापरणे, घरी परतल्यानंतर सर्व गोष्टी निर्जंतुक करणे या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील साथविकार तज्ज्ञ डॉ. अतुल मुळे म्हणाले, करोनाचे संकट पुढील किमान तीन ते चार महिने आपल्याबरोबर राहणार आहे, हे लक्षात ठेवूनच प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडावे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ साधण्यासाठी पुढे कदाचित हे निर्बंध आणखी कमी होतील, मात्र याचा अर्थ आपण करोनामुक्त झालो असा नाही. आपल्याकडे सापडणारे बहुसंख्य रुग्ण हे कोणतीही लक्षणे नसलेले म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर असिंप्टमॅटिक आहेत. या व्यक्तींच्या आजाराचे निदान झाले नाही तरी त्यांच्याकडून इतरांना त्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, हे सर्वानी लक्षात ठेवावे. अत्यावश्यक नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाहेर पडणे अनिवार्यच असेल तर मुखपट्टी वापरणे. कमीतकमी माणसांच्या संपर्कात येणे या गोष्टींचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. मुळे यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, शहरातील रुग्णसंख्या रोज शंभरच्या आसपास वाढत आहे. त्यामुळे करोनाचे संकट टळले असे मानायचे कारण नाही. क्षणोक्षणी सावध राहणे, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे निकष कटाक्षाने पाळणे हाच सध्या करोनाला प्रतिबंध करण्याचा उत्तम मार्ग आहे.

काय करावे? काय करू नये?

* मुखपट्टी आणि सॅनिटायझर सतत सोबत ठेवावे.

* सार्वजनिक ठिकाणी दरवाजाची कडी, उद्वाहकातील बटणे यांना हात लावल्यावर सॅनिटायझर वापरा.

* बाहेरून घरी आल्यानंतर दिवसभर घातलेले कपडे, मुखपट्टी धुवायला टाका, धुतल्याशिवाय पुन्हा वापरू नका.

* आजाराची लक्षणे दिसल्यास अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* सार्वजनिक जागा, ठिकाणे यांना कमीतकमी भेटी द्या.

* कमीतकमी माणसांच्या संपर्कात याल असे पहा.