दसऱ्याच्या मुहूर्तानंतर सर्वाधिक वाहन खरेदी

शहरात खासगी वाहनांची संख्या कमी होण्याची कोणतीही चिन्ह नसल्याचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात दाखल झालेल्या नव्या वाहनांच्या संख्येवरून स्पष्ट होते आहे. ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रमी वाहन खरेदी झाली असतानाच त्यापाठोपाठ आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील रस्त्यांवर सुमारे अकरा हजार नवी वाहने दाखल झाली आहेत. त्यातील सात हजार वाहने एकटय़ा पुणे शहरातील आहेत.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने शहरात वाहन खरेदीला उधाण आले होते. पुण्यात सात हजार ९८ आणि पिंपरी चिंचवडला तीन हजार ९५० नवीन वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद झाली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी आणि नोंदणी करून वाहने घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठी असते. त्यामुळे पाडव्याची सुटी असतानाही आरटीओमध्ये नव्या वाहनांच्या नोंदणीचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत नोंदणीचे काम सुरू होते. रात्री आठपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार अकरा हजार नव्या वाहनांची नोंद झाली. मात्र, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुढी पाडव्याच्या पाश्र्वभूमीवर १२ ते १८ मार्चच्या कालावधीत पुण्यात पाच हजार १६४ दुचाकी, एक हजार ९०५ मोटारी आणि ४५३ अन्य वाहनांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार ६५८ दुचाकी, ७५९ मोटारी आणि  ५३३ अन्य वाहनांची नोंद झाली. शहरातील वाहन वितरकांच्या दुकानाबाहेर रविवारी सकाळपासून वाहनांचा ताबा घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर एकटय़ा पुणे शहरात साडेआठ हजारांहून अधिक नवी वाहने रस्त्यावर आली होती. त्यात सुमारे सहा हजार दुचाकी होत्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही विक्रमी वाहन खरेदी ठरली होती. पुणे शहरामधील एकूण वाहनांची संख्या लाक्षात घेता सद्य:स्थितीत माणशी एक वाहन शहरात आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. दुचाकींच्या एक हजार क्रमांकाची मालिका अवघ्या पंधरा दिवसांत, तर मोटारींची हजार क्रमांकाची मालिका महिन्याभरात संपते. ही सर्व वाहने रस्त्यावर येत असल्याने शहरात वाहतुकीची स्थिती गंभीर झाली आहे. त्यातच आता पाडव्याच्या मुहूर्तावरही मोठय़ा प्रमाणावर नवी वाहने रस्त्यावर आली आहेत.