आपल्या मुलांबरोबरच दृष्टिहीन मुलांना वात्सल्याने सांभाळणाऱ्या.. आपल्या दृष्टीने जग दाखवून या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी दिशा देणाऱ्या.. या मुलांचे जीवन सुखकर करण्यासाठी धडपडणाऱ्या मातांचा गौरव करून रविवारी अनोख्या पद्धतीने मातृदिन साजरा करण्यात आला. पुष्पवृष्टी करून दृष्टिहीन मुलांनी मातांचे औक्षण करून त्यांना प्रेमाने घास भरवून केलेला सन्मान पाहताना उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा पाणावल्या.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टिहीन मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्था, शिक्षिका, आया आणि केअरटेकर महिला यांचा मातृदिनानिमित्त सत्कार करण्यात आला. निवांत अंध व मुक्त विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जागृती अंधशाळेच्या सकीना बेदी यांच्या हस्ते वंदना गांधी, लक्षी माटे, आरती ताकवणे, मंगल परगळे, अर्चना सरनोबत, प्रतिभा झगडे, नूतन केंद्रे यांचा सन्मान करण्यात आला. कोथरूड येथील मुलींच्या अंधशाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा पुजारी, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, गंधाली शहा, संकेत निंबाळकर, राहुल चव्हाण, बालाजी गोडगिरी, अभिषेक निंबाळकर, राहुल जाधव या वेळी उपस्थित होते. सकीना बेदी म्हणाल्या, प्रत्येक दिवस हा आईने आपल्याला दिलेली देणगी आहे. सामाजिक संस्था आईप्रमाणेच मुलांचा सांभाळ करते. जीवन सुंदर बनविण्यासाठी दृष्टिहीन मुलांमध्ये आत्मविश्वास जागविण्याच्या या उपक्रमाला बळ द्यायला हवे.