News Flash

स्वत:च्या दोन महिन्यांच्या मुलाचा ‘तिने’ बहिणीशीच केला सौदा!

स्वत:च्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगणाऱ्या त्या आईच्या चेहऱ्यावर काहीसे नाटकी भाव दिसून येत होते.

रस्त्याने जात असताना व्हॅनमधून अचानक काही जण आले व आपल्याजवळील दोन महिन्यांच्या मुलाला घेऊन ते निघून गेले.. एका आईने ही कैफियत पोलिसांसमोर मांडल्यानंतर तातडीने सर्व यंत्रणा कामाला लागली. विविध शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. पण, स्वत:च्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगणाऱ्या त्या आईच्या चेहऱ्यावर काहीसे नाटकी भाव दिसून येत होते. तेथेच संशयाची पाल चुकचुकली अन् पोलिसांनी वेगळ्याच दिशेने तपासाची चक्र फिरवली. एका माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट औरंगाबाद गाठले अन् तेथून त्या दोन महिन्यांच्या चिमुरडय़ाला ताब्यात घेतले. स्वत:चा मुलगा आपल्याच बहिणीला दोन लाख रुपयांना विकण्याचा सौदा करून या महिलेने त्याच्या  अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले..!
अर्चना मुकेश सोनवणे (वय २६, रा. कोथरूड) असे या आईचे नाव आहे. पोलिसांनी तिच्यासह तिची बहीण सविता सोनाजी संकपाळ (वय २८, रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) या दोघींना अटक केली आहे. गजबजलेल्या पौड रस्त्यावर गुरुवारी भरदुपारी साडेबाराच्या सुमारास पायी जात असताना व्हॅनमधून आलेल्या चौघांनी आपल्या हातातून मुलाला हिसकावून घेतले व चौघे जण व्हॅनमधून पसार झाल्याची तक्रार घेऊन अर्चना कोथरूड पोलीस ठाण्यात गेली होती. या प्रकारामुळे पोलीसही हादरून गेले. कोथरूड पोलिसांसह गुन्हे शाखेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी आदी वरिष्ठांनीही तातडीने या प्रकरणाच्या तपासात लक्ष घातले. खंडणीविरोधी पथकानेही तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी मुलाची आई अर्चना व वडील मुकेश यांची चौकशी केली. दोघांच्या जबाबामध्ये तफावत दिसून येत होती. अर्चनाची बहीण सविता ही औरंगाबादहून काल पुण्यात आली होती. चौकशीदरम्यान पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळाली होती. पण, ही माहिती अर्चनाने पोलिसांपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती. अर्चनाच्या चेहऱ्यावरील भावही काहीसे नाटकी वाटत होते. पोलिसांनी या सर्व गोष्टी हेरल्या. या सर्व गोष्टी व सविता पुण्यात आल्याचे लपविल्याचा धागा पकडत पोलिसांनी तपास वेगळ्याच दिशेने सुरू केला.
पोलिसांचे एक पथक सविताकडे औरंगाबादला रवाना झाले. सविताला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी करण्यात आली. आपल्या बहिणीने तिचा दोन महिन्यांचा मुलगा भीमा मोरे याच्याकडे ठेवण्यासाठी दिला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. आपण हा मुलगा दत्तक घेतला असून, मला पुण्याला जायचे असल्याने काही दिवस त्याचा सांभाळ कर, अशी बतावणीही सविताने मोरे याच्याकडे केली होती. सविताच्या कबुलीनंतर सर्व प्रकारावर लख्ख प्रकाश पडला. पोलिसांनी सवितासह दोन महिन्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर अर्चनाकडे केलेल्या चौकशीत मुलाचा सौदा व कौटुंबिक वादाच्या सर्व बाबी स्पष्ट झाल्या. अवघ्या बारा तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार, कर्मचारी संजय काळोखे, गणेश माळी, धीरज भोर, नीलेश देसाई, रमेश गरुड, चंद्रकांत सावंत, सचिन अहिवळे, पांडुरंग वांजळे, नागनाथ गवळी, बबन बोऱ्हाडे, सिद्धार्थ लोखंडे आदींनी ही कामगिरी केली.

गुन्ह्य़ाचे कारण कौटुंबिक वाद
अर्चना हिच्याशी मुकेश सोनवणे यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अर्चनाला वेगळे राहायचे असल्याने दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. दुसरीकडे राहण्यास जायचे असल्यास घर घेण्यासाठी पैसे लागणार असल्याची जाणीव अर्चनाला होती. तिची बहीण सविता ही औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये कामास आहे. तिला तीन मुली आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्चनाने स्वत:चा मुलगा सविताला दोन लाखांत देण्याबाबत सौदा केला होता. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याला वडील मुकेश सोनवणे व आजीकडे सोपविले. मुलगा परत मिळवून दिल्याबद्दल सोनवणे यांनी पोलिसांचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:25 am

Web Title: mother deal and 2 months old her child
Next Stories
1 पिंपरीत काँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्षांच्या वादात प्रदेशाध्यक्षांकडून वरवर मलमपट्टी
2 पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ची राडेबाजी सुरूच
3 डॉक्टर घेताहेत एकमेकांच्या वैद्यकीय शाखांची माहिती!
Just Now!
X