पती-पत्नीच्या वादातून सहा वर्षांच्या मुलावर चाकूचे वार करून आईनेही स्वत:ची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. देहूरोडमधील विकासनगर परिसरात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील माय-लेकराला पिंपरी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी आणि संजय (दोघांचीही नावे बदलण्यात आली आहेत.) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. आज सकाळी देखील वाद झाल्यानंतर संजय घरातून निघून गेला. साडेसातच्या सुमारास त्याने घरी दूरध्वनी करून मुलाला शाळेमध्ये पोहोचवावे, असे संजीवनी हिला सांगितले. मुलाला मारून टाकले असून मी देखील आत्महत्या करीत असल्याचे संजीवनीने संजय याला सांगितले. पत्नीचे हे बोलणे ऐकून संजय घाबरला. त्याने त्वरित एका मित्राला दूरध्वनी केला. संजीवनी रागावली असून ती आत्महत्या करण्याची शक्यता आहे, असे सांगून त्याने मित्राला आपल्या घरी जाण्याची विनंती केली. काही वेळातच संजयचा मित्र घरी पोहोचला. घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडण्याची विनंती करूनही संजीवनी हिने दार उघडले नाही. शेवटी या मित्राने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला.
संजीवनी आणि सहा वर्षांचा मुलगा संदीप (नाव बदलले आहे.) हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. संजीवनीच्या डाव्या हाताच्या मनगटावरील नसा कापलेल्या होत्या. तर, संदीपच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या असून त्यातून रक्तस्राव सुरू होता. घरगुती वापराची सुरी बाजूला पडलेली दिसून आली. मित्राने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. देहूरोड येथील दवाखान्यामध्ये माय-लेकराला नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही पिंपरी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. संदीप याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुलगा देहू रोड येथील शाळेत बालवाडीला आहे. वडील संजय हे सुतारकाम करणारे असून काही दिवसांपासून त्यांचा हा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे पती-पत्नी यांच्यामध्ये आर्थिक बाबींवरूनही वाद होत असत. त्यामुळे संजय गेल्या चार दिवसांपासून घराबाहेरच होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर मोबाईल बंद असल्याने पोलिसांना संजयचा थांगपत्ता लागला नाही. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.