पुण्याहून सहलीसाठी जाताना बेपत्ता झालेल्या चार तरुणांची मोटार पुणे-सातारा रस्त्यावरील नीरा नदीच्या पात्रात गुरुवारी दुपारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडली. या मोटारीतच उरलेल्या तिघांचेही मृतदेह आढळले असून, मोटारीची दारे ‘लॉक’ झाल्यामुळे तिघांनी बाहेर पडणे शक्य झाले नसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पुलाच्या अलीकडे ‘डायव्हर्जन’चा फलक लावल्यामुळे गोंधळून मोटार वळवत असताना ती पाण्यात पडल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली असून, त्यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेलेले एकाच कंपनीतील चौघे जण दोन नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यापैकी चिंतन बूच (वय २८, रा. अर्जुनरेखा अपार्टमेंट, बाणेर) या तरुणाचा मृतदेह नीरा नदीच्या काठी बुधवारी सकाळी आढळून आला होता. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन मोटार नदीत पडल्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने बुधवारी शोधकाम करण्यास सुरुवात केली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नीरा नदीच्या पुलाखालीच मोटार सापडली. या मोटारीत प्रणव अशोक लेले, साहिल कुरेशी आणि श्रुतिका चंदवाणी या तिघांचे मृतदेह मिळाले. क्रेनच्या सहाय्याने मोटार दुपारी बाहेर काढण्यात आली. मोटारीत तिघांचेही मृतदेह फुगलेले होते. प्रणव पुढे बाजूच्या सीटवर होता. तर साहिल व श्रृतिका हे मागील सीटवर होते. चालकाशेजारील डाव्या बाजूच्या सीटजवळील काच उघडी होती. इतर तिन्ही काचा बंद होत्या. याबाबत पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, मोटार ही शंभर पेक्षा जास्त वेगाने असावी. दोन्ही पुलाच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून पाण्यात पडली असावी. चालका शेजारी बसलेल्या बूच याने तत्काळ काच खाली करून पाण्यात बाहेर उडी मारली, पण रात्रीची वेळ असल्यामुळे पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो बुडाला असण्याची शक्यता आहे.
‘या घटनेचा तपास व्हावा’
अपघातात मृत्यू झालेल्या साहिल कुरेशीचे काका परवेज अहमद यांनी सांगितले, की अपघात झालेल्या पुलाच्या अलीकडे ‘डायव्हर्जन’चा फलक लावलेला होता. या फलकामुळे ते मोटार वळताना नदीत पडले असतील. दोन्ही बाजूच्या पुलामध्ये मोकळी जागा असून पुलाला उंच कठडे नाहीत. त्यामुळे या प्रकरणी तपास करावा.
तक्रार घेण्यास उशीर झाल्याचा आरोप
हे चौघेही पुण्यातील ‘पॅराडाईम शिफ्ट’ या जाहिरात कंपनीत नोकरी करत होते. या कंपनीच्या मालक आशिता सरकार यांनी सांगितले की, चौघेही स्वभावाने खूप चांगले होते. प्रणव हा वेब बिझनेसचा प्रमुख होता. तो अत्यंत हुशार होता. चिंतन हा खेळकर आणि नेहमी हसवणारा होता, तर श्रुतिका ही लहान मुलांप्रमाणेच होती. आमचे एक कुटुंबच होते. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबालाच एक मोठा धक्का आहे.
चौघेही बेपत्ता झाल्यानंतर मुलीचे वडील कोथरूड पोलीस चौकीला तक्रार देण्यासाठी गेले होते. पण, त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना हद्दीचे कारण सांगत चतु:शृंगी पोलीस ठाण्यास जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना फोन करून घटनेची माहिती दिल्यानंतर तत्काळ तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत पोलिसांकडून खूप चांगले सहकार्य मिळाले आहे, असेही आशिता यांनी सांगितले.