सलग चौथ्या वर्षी आखलेली सर्वोच्च शिखरांवरची मोहीम, तिच्या आयोजनातील अडथळे, अतिउंचीवरील चढाई, तिथली आव्हाने, बदलत्या हवामानाचा सामना आणि या साऱ्यांवर मात करत दोन अतिउंच शिखरांच्या माथ्यावर उमटवलेली विजयी मुद्रा.. या साऱ्या आठवणींमधून दोन सर्वोच्च मोहिमांचा थरार येथे आयोजित कार्यक्रमात उलगडला. निमित्त होते, जगातील सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची सर्वोच्च शिखरे माउंट चो यु आणि माउंट धौलागिरी सर करणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांच्या मुलाखतीचे.
गिरिप्रेमी संस्थेतर्फे सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट मोहिमेपाठोपाठ सलग चौथ्या वर्षी आठहजारी हिमशिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू आणि आता त्यापाठोपाठ या वर्षी माउंट चो यु आणि माउंट धौलागिरी या दोन हिमशिखरांवर जोड मोहिमांचे आयोजन केले होते. या दोन्ही शिखरांवर संस्थेच्या गिर्यारोहकांनी नुकतीच विजयी पताका लावली. या जोडमोहिमेचे नेते उमेश झिरपे आणि यात सहभागी गिर्यारोहक गणेश मोरे, डॉ. सुमित मांदळे, प्रसाद जोशी, अक्षय पतके, आशिष माने, पवन हाडोळे यांच्या सत्काराचे आणि त्यांचे अनुभवकथन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्योजक मनीष साबडे, विजय जोशी, उदय जाधव, शेखर नानिवडेकर, आनंद पाळंदे, उष:प्रभा पागे, प्रा. प्र. के. घाणेकर, निरंजन पळसुले, अविनाश कांदेकर आदी उपस्थित होते.
या मुलाखतीवेळी झिरपे यांनी या मोहिमेच्या आयोजनापासून ते यशापर्यंतचे अनेक टप्पे प्रगट केले. यामध्ये हवामानातील आव्हानांबरोबरच चिनी लोकांच्या असहकार्याची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. खडतर आव्हान आणि अपुरी मदत असतानाही जिद्दीच्या जोरावर या साऱ्यांवर मात करत कसे यश मिळवले याचे रोमांचकारी अनुभव त्यांनी सांगितले. ‘चो यु’ मोहिमेतील गणेश मोरे याने ७५०० फूट उंचीपर्यंत कृत्रिम प्राणवायूचा वापर न करता चढाई केली. पुढेही अशीच चढाई करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण अपुऱ्या वेळेमुळे त्याला कृत्रिम प्राणवायूचा आधार घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले. डॉ. सुमित मांदळे यानेही या मोहिमेतील अनुभव सांगितले. प्रसाद जोशी याने धौलागिरी मोहिमेतील थरार मांडला. आशिष माने, पवन हाडोळे, अक्षय पतके यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. एव्हरेस्टवीर भूषण हर्षे याने या सर्व गिर्यारोहकांची मुलाखत घेतली. साबडे, जोशी, घाणेकर यांचीही या वेळी भाषणे झाली. पागे यांनी प्रास्ताविक केले, तर पळसुले यांनी आभार मानले.