News Flash

प्रेरणा : सकारात्मकतेकडे नेणारा प्रवास

कर्णबधिरत्व हे दुहेरी अपंगत्व आहे. ऐकायला येत नाही म्हणून भाषा कानावर पडत नाही.

प्रेरणा : सकारात्मकतेकडे नेणारा प्रवास
(संग्रहित छायाचित्र)

श्रीराम ओक

कर्णबधिरत्व हे दुहेरी अपंगत्व आहे. ऐकायला येत नाही म्हणून भाषा कानावर पडत नाही. त्यामुळे बोलायला येत नाही. कर्णबधिरांच्या स्वरयंत्रात कोणताही बिघाड नसतानाही या गोष्टीमुळे त्यांची समस्या वाढीस लागते. अशा या मुलांच्या समस्या समाजासमोर याव्यात म्हणून सप्टेंबरचा तिसरा आठवडा कर्णबधिर सप्ताह म्हणून जगभर साजराही केला जातो. परदेशात फक्त एकच दिवस कर्णबधिर दिन म्हणून साजरा करतात, मात्र आपल्या देशात या समस्येसाठी सप्ताह साजरा केला जातो. या विशेष मुलांना समाजात इतरांसारखे वावरता यावे, हे वावरताना येणाऱ्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशी बिरुदावली न लावताही काही जण कार्यरत असतात. त्यांनी आपल्या जीवनातील मोठा काळ या कार्यासाठी दिलेला असतो. यापैकीच एक म्हणजे  शुभदा जोशी.

समस्या कोणतीही असो, प्रत्येक समस्येला उत्तर हे असतेच. फक्त ते शोधण्यात गफलत होऊ शकते किंवा ते शोधण्याचा कंटाळा त्या समस्येला प्रश्नांकितच ठेवतो. व्यापक दृष्टिकोन, निकोप विचार, सुसंगतता यांच्या आधारे त्या समस्येला नामोहरम करता येऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा वापर करीत आज अनेक कर्णबधिर मंडळी त्यांच्या समस्येतून मार्ग काढत आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी जशी त्यांना त्यांच्या समस्येचे उत्तर देऊ शकली, तसेच शुभदा रामचंद्र जोशी यांच्यासारख्या हाडाच्या शिक्षकांचे या मुलांना मिळणारे मार्गदर्शन तसेच या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. या दोन्हीमुळे अनेक पिढय़ा कर्णबधिरत्वाच्या समस्येने ग्रासलेल्या कुटुंबांनाही दिलासा मिळाला आहे. त्याचे श्रेय तळमळीचे शिक्षक आणि कार्यकर्त्यांना जाते. या दोन्ही भूमिका उत्तमप्रकारे निभावणाऱ्या शुभदा यांच्यामुळे कर्णबधिरत्वाची समस्येपासून सुटका मिळविणाऱ्या व्यक्तींनी केलेली प्रगती पाहली, की त्या आपण सहजच नतमस्तक होतो.

आजऱ्यासारख्या लहान गावांतून कोल्हापुरात आलेल्या शुभदा जोशी. वय वर्ष फक्त अठ्ठय़ाहत्तर. पण हे आकडय़ातील वय, ते त्यांच्या कार्यामध्ये कुठेच आड येत नाही. चाळिशीतच उत्साह संपलेल्या आणि म्हातारपण अनुभवत असल्याच्या आर्विभावात जगणाऱ्यांबरोबरच ‘ज्येष्ठत्व’ आल्याने क्रियाहीन झालेल्यांनाही क्रियाशील व्हावेसे वाटेल असे त्यांचे कार्य. नोकरी करीत असताना त्यांनी घेतलेले व्रताचा निवृत्तीनंतरही त्यांनी तेवढय़ाच जोमाने सांभाळ केला. पदवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांनी बी.एड. केले आणि भोपाळच्या रिजनल महाविद्यालयामार्फत ‘डिप्लोमा इन डेफ’ हा अभ्यासक्रमही केला. त्यानंतर पती रामचंद्र यांच्या बदलीच्या नोकरीमुळे त्या तेथे गेलेल्या असल्यामुळे तेथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. तेथून पुण्यात आल्यानंतर सुहृद मंडळ आणि श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा, पुणे येथे शिक्षिकेचे व्रत शुभदा यांनी स्वीकारले. अठ्ठावीस वर्ष नोकरी केल्यानंतर कर्णबधिर मित्रमंडळ या संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. पुणे कर्णबधिर मित्रमंडळातर्फे विवाह मंडळ कर्णबधिरांसाठी चालविले जाते. या मंडळामार्फत शुभदा यांनी २००६ मध्ये कर्णबधिर विवाहेच्छुंसाठी विवाह मेळावा आयोजित केला होता. त्यासाठी राज्यभरातून सातशेहू अधिक मुले-मुली पालकांसह उपस्थित होती. या मेळाव्यामुळे कर्णबधिरांबद्दल समाजात जाणीव निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने सहभागी तसेच कार्यकर्त्यांनी दिली होती.

कर्णबधिर मंडळींना ऐकू येण्यासाठी यंत्र दिली जातात, तरी देखील त्यांना संपूर्ण ऐकू येत नाही. त्यांच्या कानावर चारचौघांसारखे आवाज पडणे जसे आवश्यक असते, तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असते. याशिवाय त्यांचे व्यंग मुळातूनच समजून घेतले जात नाही. तसेच सामान्य शाळांमधून त्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते या विचारामुळे सुहृद मंडळाने एस.एस.सी. बोर्डाशी चर्चा करून कर्णबधिर मुलांसाठी सामान्य शाळांमधून प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि इतर एस.एस.सीच्या परीक्षेला बसणाऱ्यांप्रमाणे परीक्षेला बसण्याची सोय उपलब्ध करून दिली. या कार्यातही शुभदा सहभागी होत्या.

पाश्चात्त्य देशात मूल जन्मल्यापासून ते नॉर्मल आहे का, त्याच्यामध्ये काही समस्या आहे, हे तपासले जाते. पण आपल्याकडे प्रगत साधने उपलब्ध नसल्यामुळे सहा महिन्यांनंतर तर ग्रामीण भागात त्याहून थोडे उशिराच समजते. मूल कर्णबधिर असेल, तर अगदी लहानपणापासून उपचार सुरू केले तर बराच फायदा होतो. पण आपल्या देशात पालक आपले मूल कर्णबधिर आहे, हे स्वीकारायला तयार नसतात, याची खंतही शुभदाताई व्यक्त करतात.

शुभदा जोशी यांनी घडवलेल्या हेमा साठे या विद्यार्थिनीच्या कुटुंबातील सर्वच मंडळी कर्णबधिर. हेमा या त्यांच्या कुटुंबातील चौदावे अपत्य, ते देखील कर्णबधिर म्हणूनच जन्माला आले. तिच्या मावशीने दीड वर्षांच्या या मुलीला पुण्याला आणले, तिच्यावर उपचार सुरू केले. शुभदा यांच्यासह हेमा साठे यांना मिळालेले प्रोत्साहन, उपचार, त्यांचा आत्मविश्वास यामुळे आजच्या घडीला त्या पदवीधर असून स्वत:च्या पायावर उभ्या तर आहेतच, त्याबरोबरच त्या व्याख्याने देण्याइतके उत्तम बोलू शकतात हे विशेष. साठे यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनींना घडविण्याचे श्रेय शुभदा यांना जाते. त्या आजही या कार्यात अग्रेसर असून डॉ. वाचासुंदर यांच्या डायग्नोस्टिक्स सेंटरमध्ये त्या आठवडय़ातील काही तास जातात.

कर्णबधिर मुलांची टिंगल टवाळी केल्यास सामान्य माणसांप्रमाणेच त्यांनाही राग येऊ शकतो आणि त्यातून अविवेकी कृत्य देखील घडू शकते. त्यामुळे या मुलांनी संयम सोडू नये, यासाठी समाजाने त्यांना धुडकावण्यापेक्षा त्यांना समाजात सामावून घेणे आवश्यक असल्याचे सांगत शुभदाताई यासाठी देखील जागृतीचे कार्य करतात. या मुलांचे डोळे हेच कान असतात. ही मंडळी भाषा दृश्य स्वरूपात पाहतात. या मुलांना आपलेसे करून घेण्यावर भर देणाऱ्या शुभदा यांनी ठाकरसी कन्याशाळेत शिकवताना अनेक प्रयोग केले. तेव्हाचीच तळमळ आजही त्यांच्या कार्यात असून त्यांचे कार्य जाणून घ्यायचे असेल आणि त्यांच्यासारखे कार्य करायचे असेल तर (०२०) २४२२८४२३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

याशिवाय चित्र आणि शब्दांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कात्रणांचे प्रदर्शनही त्या आयोजित करतात. त्यासाठी पुण्यात व पुण्याबाहेर विविध शहरे तसेच ग्रामीण भागातही त्या जातात. त्यांच्या या कार्यात हेमा यांचाही सहभाग कायम असतो.

जिद्द, चिकाटी याबरोबरच थोडेसे धाडस आणि परिश्रम केल्यानंतर कर्णबधिरत्वही आपली मान तुकवेल आणि कर्णबधिरांनाही समाजात ताठ मानेने उभे राहता येईल. यासाठी गरज आहे कर्णबधिरांना, त्यांच्या विचारांना समजून घेण्याची. त्यांच्याशी संवाद साधण्याची.

shriram.oak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:30 am

Web Title: moving tour to positivity
Next Stories
1 वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतून ५६ कंपन्यांचा काढता पाय..
2 दाभोलकरांची हत्या झालेल्या पुलावर सचिन अंदुरेला घेऊन जात सीबीआयची पाहणी
3 वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका
Just Now!
X