‘‘देशाने पर्यावरणविषयक अनेक नवीन पावले उचलली असून १ लाख ७५ हजार मेगाव्ॉट अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ४० हजार मेगॅवॉटचे करार झाले असून सौर विजेचा प्रतियुनिट दर १९ रुपयांवरुन ४ रुपये ३० पैसे प्रतियुनिटवर आला आहे, कारण आमच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आहे. २०३० सालापर्यंत आपण कार्बन न जाळता आपली ४० टक्के ऊर्जा तयार करु शकू,’’ असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रात ‘हवामान बदल’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक या वेळी उपस्थित होते. हवामानबदलाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील मुद्दय़ांविषयी जावडेकर यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांमधील पर्यावरणाशी संबंधित निर्णयांबाबत ते म्हणाले,‘‘प्रस्तावित अपारंपरिक ऊर्जेत १ लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जा व ६० हजार मेगाव्ॉट पवन ऊर्जेचा समावेश आहे. यातील ४० हजार मेगॅवॉटचे करार झाले आहेत. निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे सौर विजेचा प्रतियुनिट दर १९ रुपयांवरुन ४ रुपये ३० पैसे प्रतियुनिटवर आला आहे. २०३० सालापर्यंत आपण कार्बन न जाळता आमची ४० टक्के ऊर्जा तयार करु शकू. कोळशावर ४०० रुपये प्रतिटन कर आकारण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. डिझेल वाहने, एसयूव्ही, पेट्रोल वाहने यावरील अबकारी कराच्या वाढीतून गोळा होणारी रक्कम ‘क्लीन एनर्जी’साठी वापरण्याचे ठरवले. त्याच वेळी कार्बन उत्सर्जन न करणाऱ्या ‘इलेक्ट्रिक’ व ‘हायब्रिड’ वाहनांवर ३० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला.’’
‘मोदींनी द्यायची सवय लावली!’
पंतप्रधानांनी एलपीजीवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केल्यानंतर १ कोटी २० लाख लोकांनी त्यास प्रतिसाद दिला, असे सांगून जावडेकर यांनी तामिळनाडू सरकारच्या मोफत देण्याच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले,‘‘आजवर समाजाला घ्यायची सवय लावण्यात आली होती. द्यायची सवय मोदींनी लावली. लोकप्रिय राजकारणात फुकट देण्यावर भर असतो. मी आत्ता तामिळनाडूतून येतो आहे. तिथे फुकट देण्यावर भर आहे. ‘या प्रकारे सरकार तुम्हाला भिकारी करत आहे,’ असे मी तिथे भाषणात म्हणायचो तेव्हा लोकांचा प्रतिसाद मिळायचा. तामिळनाडूत १०० कोटी रुपये केवळ निवडणूक आयोगाने जप्त केले. निवडणुकीचा खर्च त्यातूनच निघाला! म्हणजे अंदाजे हजार कोटी वाटले गेले असावेत. परंतु हे दिवस संपत आले आहेत. लोकांना स्वाभिमानाने जगायचे आहे.’’