अरुण जेटली यांच्या हस्ते ‘अमरवाणी’चे उद्घाटन

पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेले व राज्यसभेची खासदारकी मिळालेले अमर साबळे राजकारणात स्थिरसावर झाले असून आता त्यांनी स्वत:चे ‘न्यूज पोर्टल’ तसेच ‘न्यूज अ‍ॅप’ सुरू केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते दिल्लीत संसद भवनात एका छोटेखानी कार्यक्रमात या ‘न्यूज पोर्टल’च्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, मनसुख मांडविया, पीयूष गोयल, पुरुषोत्तम रूपाला, खासदार संजय राऊत, अजय संचेती, आर. के. सिन्हा, विकास महात्मे, सुभाष चंद्रा, रूपाली गांगुली आदी उपस्थित होते.

या वेळी जेटली म्हणाले, की भारताची वाटचाल डिजिटल क्रांतीच्या दिशेने सुरू आहे. या क्रांतीमध्ये ‘अमरवाणी न्यूज पोर्टल’ आणि ‘न्यूज अ‍ॅप’ने आपला सहभाग नोंदवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला हातभार लावला आहे. खासदार साबळे म्हणाले, मी २० वर्षे पत्रकार होतो. खासदार झालो तरी रक्तातील पत्रकार स्वस्थ बसू देत नव्हता. राजकारणाबरोबरच पत्रकारितेतून काम करण्याची इच्छा असल्यामुळेच ‘अमरवाणी’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली.