भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लिखित पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात खासदार अनिल शिरोळे यांना व्यासपीठावर स्थान न दिल्यामुळे त्याची उलट सुलट चर्चा पक्षात सुरू आहे. या कार्यक्रमात राज्यमंत्र्यांसह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर असताना शिरोळे यांना मात्र सभागृहात पहिल्या रांगेत बसावे लागले. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही या गटबाजीची दबक्या आवाजात चर्चा रंगली होती. दरम्यान, या गटबाजीबाबतची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडेही करण्यात आल्याचे समजते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लिखित ‘भारतीय जनता पक्ष राजकारणात कशासाठी?’ या पुस्तिकेचे प्रकाशन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. या पुस्तिकेच्या मराठी, हिंदूी आणि इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रविवारी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झाला.

हा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा असला तरी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार-खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे आणि महापौर मुक्ता टिळक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अनिल शिरोळे यांचे व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावर आपल्याला स्थान असेल असे वाटल्यामुळे त्यांनी व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यासपीठावर बसण्याची संधी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि ते सभागृहात पहिल्या रांगेत स्थानापन्न झाले. कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ते थांबले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून येत होती.

दरम्यान, कार्यक्रम सुरू झालेला असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप काबंळे यांचेही व्यासपीठावर आगमन झाले. कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांसह अन्य वक्त्यांनी खासदार शिरोळे यांचा नामोल्लेख केला नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा कार्यक्रम अधिकृतरीत्या पक्षाचा नव्हता. प्रबोधिनीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे व्यासपीठावर कोणाला निमंत्रित करायचे आणि कोणाला बोलण्याची संधी द्यायची, याचा सर्वस्वी निर्णय प्रबोधिनीच्या संयोजकांचा होता. या कार्यक्रमावरून कोणीही नाराज झालेले नसल्याचा दावा भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आला.

या प्रकारानंतर शिरोळे यांनी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडेही त्याबाबत तक्रार केल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली, तर या वादावरून पालकमंत्री आणि शिरोळे यांच्यातही सोमवारी रात्री चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, या वादाबाबत खासदार शिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी नाराज होण्याचे काहीच कारण नाही. तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता. एका संस्थेचा कार्यक्रम होता. त्यामुळे अन्य सर्व आमदार व पदाधिकारी सभागृहात जेथे बसले होते, त्यांच्याच बरोबर मी बसलो होतो.