नव्या वर्षांनिमित्त खासदार अनिल शिरोळे यांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यावरून शहरात राजकीय चर्चाना उधाण आले आहे. लोकसभेच्या आगामी निवडणूक तयारीच्या दृष्टीने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्नेहमेळाव्याला शहरातील सर्व घटकांकडून प्रतिसाद मिळावा यासाठी स्वत: खासदार शिरोळे यांच्याकडून जोरदार प्रयत्न होत असल्यामुळे स्नेहमेळाव्याला पक्षातील समर्थक व विरोधकांसह कोण-कोण उपस्थित राहणार, पक्षातील गटबाजीच्या पाश्र्वभूमीवर शिरोळे शक्तिप्रदर्शन करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक मुदतपूर्व होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुदतपूर्व निवडणूक झाल्यास डिसेंबर महिन्यात लोकसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. यानिमित्ताने खासदारकीला पावणेचार वर्षे झाल्यानंतर प्रथमच शिरोळे यांनी आयोजित केलेला हा  स्नेहमेळावा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शिरोळे शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटतट आणि अंतर्गत वाद सातत्याने पुढे येत आहेत. या पाश्र्वभूमीवर शिरोळे यांनी गेल्या आठवडय़ात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचीही भेट घेतली होती. निवडणुकीची आणि स्नेहमेळाव्याच्या तयारीची चर्चा या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत होते. या स्नेहमेळाव्यासाठी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाही निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. तसेच, शहरातील विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पक्षातून अनेक जण खासदारकीसाठी इच्छुक आहेत. पालकमंत्री गिरीश बापट हेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर बापट यांनी दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम ठेवला होता.मात्र बापट आणि शिरोळे यांच्यातील मतभेद तसेच बापट यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले काकडे आणि शिरोळे यांच्यात दिलजमाई झाल्यामुळे बापट उपस्थित राहणार का, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीसाठी शिरोळे यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.