भाजपा व शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांची घोषणा केल्यानंतर, आपण त्या ठिकाणच्या उमेदवारांची नावं जाहीर करणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर यावर खासदार गिरीश बापट यांनी विशेष टिप्पणी केली आहे. खासदार बापट यांनी अजित पवार यांना यावरून टोला लगावत, आम्ही कोणाची वाट पाहणार नाही. आमची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील तर ते तिकडे जातील व तेव्हा राष्ट्रवादी पक्ष उमेदवारी जाहीर करेल असे म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पक्ष मेळाव्यात अजित पवार यांनी म्हटले होते की, भाजपा-शिवसेना यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण त्या जागांबद्दलची भूमिका स्पष्ट करणार आहोत. त्यांनी आमच्यावर खेळी केली आहे, आपलेच उमेदवार घेऊन आपल्याच विरोधात उभे केले आहेत. त्यामुळे काट्याने काटा काढायचा आहे. त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे? कोणाला उमेदवारी दिल्यानंतर ताकदीने काम होईल आणि कोणता उमेदवार निवडून येऊ शकेल हे पाहिलं जाईल. तसेच आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं होतं.

अजित पवारांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला पत्रकार परिषदेत उत्तर देताना, खासदार बापट म्हणाले की, आम्ही त्यांची वाट पाहणार नाहीत. आता त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. आमची यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील तर ते त्यांच्याकडे जातील. तेव्हा ते यादी जाहीर करतील. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत. असा टोलाही यावेळी खासदार बापट यांनी लगावला.