महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होणार की नाही, या विषयावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असतानाच खासदार संजय काकडे यांना शिवसेनेशी युती करण्याची इच्छा आणि गरजही वाटत नाही, असे प्रतिपादन बुधवारी पत्रकार परिषदेत केले. शहरात भाजपचे आठ आमदार, खासदार आणि मंत्री असा फौजफाटा आहे आणि पक्ष स्वबळावर ८० ते १०० जागा मिळवेल. त्यामुळे युतीची गरजच काय, असा प्रश्न करतानाच युतीबाबतचे हे वैयक्तिक मत आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही काकडे म्हणाले.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. युती करावी की नाही, याबाबत भाजपमध्ये संमिश्र मते आहेत. त्याबाबत शहर भाजपमध्ये चर्चा सुरू असतानाच काकडे यांनी मात्र युतीची गरज नसल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, की निवडणुकीमध्ये पक्षाला ८० ते १०० जागा मिळतील. शहरात भाजपचे वर्चस्व वाढत आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील. माझे मत मी पक्षाला कळविणार आहे.

भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह मनसेचे नगरसेवक आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांसह दिनेश धाडवे, पप्पू घोलप, राम शिंदे या गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांनी प्रवेश केला आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या लोकांना प्रवेश दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरही टीका सुरू झाली आहे. त्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना काकडे यांनी या सर्वाच्या पक्षप्रवेशाचे समर्थन केले. त्यांच्यावर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, असे काकडे म्हणाले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अन्य पक्षातील २० ते २५ नगरसेवक आणि शंभर कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रवेश झाला म्हणजे उमेदवारी मिळाली, असे नाही. पक्ष प्रवेशासाठी उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले नाही. उमेदवारी देण्याचे काही निकष आहेत. निवडणुकीसाठी पक्षाने माझ्यासह काही पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. समाजातील काही घटकांना पक्षात आणण्याची जबाबदारी माझ्यावर असली, तरी पालकमंत्री बापट हेच पुण्याचे कारभारी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बापटकाकडे आमनेसामने

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसह नगरसेवकांना भाजपमधील पक्षप्रवेशाची माहिती पालकमंत्र्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांना होती असे खासदार संजय काकडे म्हणत असले तरी त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावरून खासदार संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट आमने-सामने आले आहेत.  बापट यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षप्रवेश करण्यात आले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. मात्र पक्षप्रवेशाची माहिती ही बापट यांना देण्यात आली होती. नावांची यादी त्यांच्यामार्फतच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती, असे काकडे यांनी पत्रकारांना सांगितले, पण या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षप्रवेशावरून हे दोघे आमने-सामने आल्याचेही स्पष्ट झाले असून पक्षातील वर्चस्ववादही पुढे आला आहे.

बोडके प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कुख्यात गुंड बाबा बोडके याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर टीका सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही भाजपवर टीका केली. मात्र काही वर्षांपूर्वी बोडके टीका करणाऱ्यांच्या मांडीवर बसण्याचेच बाकी होते, असे खासदार काकडे म्हणाले.