पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेचे आज (मंगळवार) भूमिपूजन झाले. मात्र, हा कार्यक्रमही वादापासून दूर राहिलेला नाही. भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे हे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने अनुपस्थित राहिल्याचे वृत्त काही मराठी वाहिन्यांनी दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण नव्हते. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध केला आहे.

मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी असल्याचे वृत्त होते. तोच प्रकार पुण्यात घडला पण तो भाजपाचे खासदार आणि राष्ट्रवादीच्या खासदारांबाबत घडला. तत्पूर्वी, सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला होता. त्यानंतर आज खासदार संजय काकडे यांनीही याच कारणासाठी कार्यक्रमाला न जाणे पसंत केल्याचे दिसते. ‘एबीपी माझा’ने यासंबंधी वृत्त दिले आहे.

अशा कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले जाते. परंतु, राष्ट्रवादीच्या लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे आणि राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांना मात्र आमंत्रण नव्हते. त्यामुळे विरोधकांबरोबर भाजपातही नाराजीचा सूर दिसून आला.