आव्हान-प्रतिआव्हान आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. ठरावीक कालावधीनंतर त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात. त्यानुसार, ‘लक्ष्य २०१९’ च्या पाश्र्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. दोन वेळा समोरासमोर लढल्यानंतर आणि दोघांनीही एकेकदा पराभवाची चव चाखल्यानंतर त्यांच्यात पुन्हा ‘आमने-सामने’ लढण्याची ‘खुमखुमी’ कायम असल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभेसाठी बारणे व जगताप यांनी एकमेकांना लढण्याचे खुले आव्हान दिले आहे.

बारणे व जगताप सर्वप्रथम २००९ च्या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आले होते. चिंचवड विधानसभेसाठी बारणे शिवसेनेचे उमेदवार होते. आघाडीच्या जागावाटपात चिंचवडची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या गोटात असलेल्या आमदार जगताप यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. तेव्हा जगताप निवडून आले होते. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर बारणे यांनी २०१२ मध्ये पुन्हा पालिकेची निवडणूक लढवली, तेव्हा जेमतेम २०० मताधिक्याने ते निवडून आले होते. २०१४ मध्ये नगरसेवक असतानाच बारणे यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. या वेळी मनसे-शेकाप युतीचे उमेदवार म्हणून जगताप रिंगणात उतरले. मात्र, बारणे यांच्याकडून मोठय़ा फरकाने जगताप पराभूत झाले. विधानसभेत जगतापांकडून पराभूत झालेल्या बारणे यांनी लोकसभेत त्या पराभवाची परतफेड केली. आता बारणे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. तर, जगताप पिंपरी भाजपचे शहरप्रमुख आहेत. दोघांमध्येही बाराही महिने कलगीतुरा सुरू असतो, त्यासाठी कोणतेही निमित्त पुरेसे ठरते.

या पाश्र्वभूमीवर, लोकसभा निवडणुकांचे पडघम सुरू झाले असताना, मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या बारणे व जगताप यांच्यातील वादाला फोडणी मिळाली आहे. जगताप यांच्या म्हणण्यानुसार, श्रीरंग बारणे मोदी लाटेवर खासदार झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी बारणे यांना अपयश आले आहे.

पक्षासाठी आणि जनतेसाठी बारणे अपयशी खासदार ठरले आहेत. भाजपची सर्वत्र विजयी घौडदौड सुरू असल्याची बारणे यांनी धास्ती घेतली आहे. बारणे सध्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यासाठीच पक्षात विनाकारण वाद उकरून काढत आहेत. त्यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी शिवसेनेकडून खासदारकीची निवडणूक लढवून दाखवावी. भाजपचे कार्यकर्ते त्यांना अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.

बारणे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानुसार, श्रीरंग बारणे या नावाची जगतापांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच आव्हान देण्याचे उसने अवसान ते आणत आहेत. अशाच प्रकारे २०१४ मध्ये त्यांनी, बारणे उमेदवार असतील तरच मी लोकसभा लढणार, असे आव्हान दिले होते. प्रत्यक्षात, मोठय़ा फरकाने मी विजयी झालो. आता २०१९ साठी जगताप पुन्हा आव्हान देत आहेत. तो माझ्यासाठी शुभशकूनच आहे. जगताप यांना भाजपमुळे अंगावर मुठभर मांस वाढल्यासारखे वाटत असेल, त्यामुळे ते वल्गना करू लागले आहेत. जगतापही मोदी लाटेमुळेच आमदार झाले आहेत, त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. १३ वर्षे ते आमदार आहेत. किती वेळा सभागृहात त्यांनी तोंड उघडले, हे त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना सांगावे.

मोदी लाटेमुळचे जगताप आमदार होऊ शकले. शिवसेनेत येण्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’च्या पायऱ्या झिजवूनही त्यांना थारा मिळाला नाही. तीन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये गेले. मात्र, सगळीकडे आपल्यामुळेच भाजपची सत्ता आल्याचा आव ते आणत आहेत.

श्रीरंग बारणे, खासदार, शिवसेना

मोदी लाटेत बारणे खासदार झाले, तसे ते नगरसेवकही होऊ शकत नाहीत. ते अपयशी खासदार ठरले आहेत. त्यांना शिवसेनेतून बाहेर पडायचे असल्याने ते पक्षात विनाकारण वाद उकरून काढत आहेत.

लक्ष्मण जगताप, आमदार, भाजप