राज्य परिवहन महामंडळाच्या संपामुळे लोकांचे हाल होत आहेत. दिवाळी सुरू झालेली असतानाच गावाला जाणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाता येत नाहीये. सरकार काय करते आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र लोकप्रतिनिधी प्रवाशांच्या मदतीला धावले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्याहून बारामतीच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कारमध्ये प्रवाशांना लिफ्ट दिली. प्रवाशांशी बोलून त्यांच्या वेदनाही जाणून घेतल्या. सातवा वेतन आयोग आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. काही प्रवाशांना जेजुरीला जायचे होते, या प्रवाशांमध्ये एका रूग्णाचाही समावेश होता.

सुप्रिया सुळे यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर तातडीने या सगळ्यांना त्यांच्या कारमध्ये बसवले. तर दुसऱ्या एका कारमधून इतर काही प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे सोडण्यास सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यातील माणुसकीचे दर्शनच या प्रसंगातून झाले. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एस.टी.च्या संपाबाबत सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच काही प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास कारमध्ये बसवले असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी अशा प्रकारची कृती जेव्हा करतात तेव्हा लोक त्यांच्यातली माणुसकी कायम लक्षात ठेवतात. संप काळात सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये लिफ्ट मिळालेले प्रवासी त्यांची ही मदत कधीही विसरणार नाहीत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.