पुणे : राज्यसेवेतून निवड होऊनही राज्य शासनाकडून नियुक्ती रखडलेल्या भावी अधिकाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. १५ जुलैच्या आत नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी उमेदवारांनी ‘खूप झाल्या समित्या, आता हव्या नियुक्त्या’ असे फलक हाती घेऊन शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर चक्का जाम आंदोलन के ले.

राज्यसेवा २०१९ परीक्षेचा निकाल गेल्यावर्षी जूनमध्ये जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा पदांसाठी ४१३ उमेदवारांची  निवड करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या उमेदवारांना शासनाकडून नियुक्तीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे नियुक्तीची प्रतीक्षा करण्यात वर्ष गेल्यानंतर अस्वस्थ उमेदवारांनी अखेर शुक्रवारी सकाळी शास्त्री रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरू केले.  पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन या उमेदवारांना पांगवल्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियुक्तीबाबत निवेदन दिले.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियुक्तीबाबत निवेदन दिले असता त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे महेश पांढरे या उमेदवाराने सांगितले.