उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे या महिना अखेरीपर्यंत गेले दोन वर्षे रखडलेले निकाल जाहीर होणार असल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पदाचा २०१३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कोल्हापूरमधील अर्शद मकानदार हा उमेदवार राज्यात प्रथम आला आहे तर महिलांमध्ये औरंगाबाद येथील नीता कदम अव्वल ठरली आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल रखडले होते. ऑगस्ट २०१४ मध्ये शासनाने समांतर आरक्षणाबाबत निर्णय जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, तरीही त्यातील अनेक तांत्रिक बाबींबाबत शासनाने काहीच स्पष्ट आदेश दिले नाहीत. त्यामुळे बहुतेक परीक्षांचे २०११ पासूनचे निकाल सुधारित करून अंतिम निकालाबाबत आयोगाने शासनाकडे स्पष्टीकरण मागितले. मात्र, त्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट न केल्याने निकाल जाहीर करता आले नाहीत. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर निकाल जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. दरम्यान, शासनानेही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता येत्या महिनाअखेपर्यंत आयोगाकडून जवळपास ३० ते ४० निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

पोलिस उपनिरीक्षकपदाचा २०१३ च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. आयोगाकडून ७१४ जागांसाठी मे २०१३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ऑगस्ट २०१३ मध्ये या पदासाठी पूर्वपरीक्षा झाली, तर ८ डिसेंबर २०१३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यानच्या काळात पोलिस उपनिरीक्षकपदाच्या २०१४ च्या परीक्षेच्या २६० पदांच्या मुलाखतीही झाल्या असून या महिन्यांत शारीरिक चाचणी होणार आहे. पशुधन अधिकारी पदासाठी २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अभियांत्रिकी सेवा, वनसेवा, तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि प्राचार्य, वैद्यकीय सेवा यांसह इतर अनेक पदांचे निकाल या महिना अखेरीपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली.