महाराष्ट्र लोकसेवा आयोग सध्या एकसदस्यीय झाला आहे. आयोगातील सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपूनही शासनाने नवी नियुक्ती न केल्यामुळे आयोगामध्ये आता एकच सदस्य आहेत. आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांचाही कार्यकाळ शनिवारी संपुष्टात आल्यामुळे एकमेव सदस्य राहिलेल्या प्रकाश ठोसरे यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. आयोगामध्ये सदस्यच राहिले नसल्यामुळे निर्णय प्रक्रिया, मुलाखती खोळंबण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये आता एकच सदस्य राहिले आहेत. आयोगामध्ये सहा सदस्य असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष आणि तीन सदस्य अशी अवस्था होती. जानेवारीमध्ये यातील दोन सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर जानेवारीपासून आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे आणि एक सदस्य अशा अवस्थेत आयोगाचा कार्यभार रेटला जात होता. मात्र, आता परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ठाकरे यांचाही कार्यकाळ शनिवारी (१७ मे) संपुष्टात आला. सध्या आयोगामध्ये प्रकाश ठोसरे हे एकमेव सदस्य राहिले आहेत. ठाकरे यांच्या निवृत्तीनंतर सध्या ठोसरे यांच्याकडेच आयोगाच्या अध्यक्षपदाची प्रभारी सूत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या ठोसरे हेच आयोगाचे अध्यक्ष, सदस्य असे सर्वेसर्वा आहेत. मात्र, त्यांच्याकडेही प्रभारी कार्यभार असल्यामुळे अधिकारांना मर्यादा आहेत.
सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी म्हणून पाठपुरावाही करण्यात येत होता. मात्र, तरीही रिक्त झालेल्या पदांवर शासनाकडून सदस्यांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे आता सरासरी ५० परीक्षा, त्यांच्या मुलाखती, विभागीय चौकशांच्या अहवाल अंतिम करणे, सेवा अटी मान्य करणे, पदोन्नतीचे शासनाने दिलेले अहवाल अंतिम करणे अशी अवाढव्य जबाबदारी सांभाळण्यासाठी एकच व्यक्ती आहे. परिणामी महत्त्वाचे निर्णय, मुलाखती रखडण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या दोन वर्षांमध्ये रखडलेल्या नियुक्तयांचा अनुशेष बहुतांशी भरून काढला. मात्र, पोलिस उपनिरीक्षक पदाच्या गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेच्या साडेतीन हजार मुलाखती, पशु संवर्धन विभागातील दीड हजार मुलाखती आणि इतर काही विभागांच्या साधारण एक हजार मुलाखती अशा साधारण सहा हजार मुलाखती रखडण्याची चिन्हे आहेत. त्यातच नव्याने होणाऱ्या परीक्षांची भर पडतच आहे. आयोगामध्ये सहा सदस्य असतात, त्या वेळी महिन्याला साधारण अडीच हजार मुलाखती होऊ शकतात. मात्र, आता या मुलाखती घ्यायला आयोगात सदस्यच नाहीत, अशी परिस्थिती आहे.