महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) या वर्षी होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेल्यामुळे या परीक्षा देण्यासाठी शेवटची संधी असणाऱ्या उमेदवारांना वयाच्या अटीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये विविध परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला एप्रिलमध्ये ‘व्हायरस’ चा फटका बसला होता. त्यामुळे संकेतस्थळावर विविध परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची माहिती संकेतस्थळावरून नष्ट झाली होती. या सगळ्या प्रकारामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेबरोबरच त्या दरम्यान होणाऱ्या सर्वच परीक्षांचे वेळापत्रक आयोगाला बदलावे लागले. आयोगाच्या वर्षभरातील सर्वच परीक्षांचे वेळापत्रक यामुळे विस्कळीत झाले आहे. आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या जाहिराती अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा प्रसिद्ध होत आहेत. आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जूनमध्ये अपेक्षित असलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षा देण्याची शेवटची संधी असलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. जाहिराती प्रसिद्ध होण्यास उशीर झाल्यास वयाच्या कमाल मर्यादेमध्ये न बसल्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. आयोगाच्या परीक्षा देणारे उमेदवार परीक्षांच्या तारखांनुसार वर्षभराचे नियोजन करतात. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या सर्वच उमेदवारांमध्ये तारखांबाबत उत्सुकता आहे.
याबाबत ठाकरे यांनी सांगितले, ‘‘आयोगाची माहिती सांभाळण्याची जबाबदारी नव्या कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे जाहिराती प्रसिद्ध होण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र, या महिन्यामध्ये एक एक करून सर्व जाहिराती प्रसिद्ध होतील. वयाच्या अटीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयोगाकडे नाहीत. शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेच्या ज्या अटी असतील, त्याप्रमाणे कार्यवाही होईल.’’
व्हास्ट इंडिया कंपनीबरोबरचा करार रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या व्हास्ट इंडिया या कंपनीबरोबरचा करार आयोगाने रद्द केला आहे. परीक्षेपूर्वी झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर चौकशी सुरू असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी दिली. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित घटकांवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.