मराठी माणूस हा उत्सवप्रिय असल्याने महाराष्ट्रामध्ये वर्षभर वेगवेगळी संमेलने होत असतात. िपपरी-चिंचवड येथे जानेवारीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि फेब्रुवारीमध्ये ठाण्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन होणार आहे. आता रविवारी (७ फेब्रुवारी) श्री श्रेत्र आळंदी येथे असेच आगळेवेगळे संमेलन भरणार आहे ते मृदुंगवादकांचे. विश्वरूप दर्शन मंच येथे सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या अखिल भारतीय पखवाज आणि मृदुंग संमेलनामध्ये भारतातून सात हजार मृदुंगवादक सहभागी होत आहेत.
प्राचीन काळी शिवमंदिरामध्ये गायल्या जाणाऱ्या ध्रुपद गायकीमध्ये मृदुंग आणि पखवाज या वाद्यांचा वापर केला जात असे. कर्नाटक शैलीच्या गायनामध्येही तालनिर्मितीसाठी मृदुंग वापरले जाते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेली आळंदी या तीर्थक्षेत्री रविवारी मृदुंगवादकांचा मेळा भरणार आहे तोही त्यांच्या कलाविष्कार सादरीकरणासह. विश्वशांती केंद्र माईर्स एमआयटी, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांनी हा अनोखा योग जुळवून आणला आहे.
विश्वरूप दर्शन मंच येथे सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सात हजार मृदंगांच्या नादाचा अनुभव भाविक आणि संगीतप्रेमी रसिकांना घेता येणार आहे. प्रसिद्ध पखवाजवादक उद्धवबापू आपेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा कलाविष्कार साकार होत आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्रीश्री रविशंकरजी या वेळी उपस्थित राहणार असून ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कीर्तनकार मारुती महाराज कुऱ्हेकर, आध्यात्मिक गुरू स्वामी परिपूर्णानंद, कनार्टक येथील मृदंगाचे बादशाह पालघट मणी राघू उपस्थित राहणार आहेत. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून होतकरू पखवाजवादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्वशांती केंद्रातर्फे ७५ पखवाज भेट देण्यात येणार आहेत. या संमेलनामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व मृदुंगवादकांचा ज्ञानेश्वरमाउली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांची प्रतिमा असलेली शाल आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.